बीएमसी पालिका रुग्णालयांचे खासगीकरण? म्युनिसिपल मजदूर युनियनचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:22 IST2025-03-27T14:20:42+5:302025-03-27T14:22:53+5:30

रुग्णसेवा महागण्याची शक्यता

Privatization of municipal hospitals? Municipal workers' union warns of agitation, possibility of patient services becoming expensive | बीएमसी पालिका रुग्णालयांचे खासगीकरण? म्युनिसिपल मजदूर युनियनचा आंदोलनाचा इशारा

बीएमसी पालिका रुग्णालयांचे खासगीकरण? म्युनिसिपल मजदूर युनियनचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गरीब व गरजू रुग्णांसाठी आधार ठरत असलेल्या पाच रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव मुंबई महापालिकेने आखला आहे. मात्र, नागरिकांच्या कराच्या पैशांतून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयांचे खासगीकरण होऊ देणार नाही. प्रसंगी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस वामन कविस्कर यांनी दिला.

बोरीवली येथील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट पालिकेने घातला आहे. टेंडरची नोटीस निघाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र, पालिकेने वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालय, बोरीवली येथील सावित्रीबाई फुले रुग्णालय, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालय आणि महात्मा फुले रुग्णालय या पाचही रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव आखला असल्याचा आरोप कविस्कर यांनी केला. 

‘अद्ययावत सुविधा उभारल्यानंतर कंत्राट’

भगवती रुग्णालयात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आता त्याचे खासगीकरण केले जात आहे. पालिकेचा हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. प्रशासनाच्या या मनमानी निर्णयाविरोधात युनियनतर्फे लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

  • जनतेच्या पैशांतून पालिकेने नवीन रुग्णालये बांधली असून, ती खासगी संस्थांना देऊन गरीब रुग्णांचे उपचार महाग केले जात आहेत. तर, दुसरीकडे पालिका कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचा दावा युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी केला आहे. 
  • नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. पालिका प्रशासन भांडवली कामामध्ये व्यस्त आहे. कायम ठेवींमधील रक्कम कमी झाली आहे. त्यामुळे पालिकेवर आता कर्ज काढण्याची वेळ आली आहे. 
  • पालिकेने तरीही नवीन रुग्णालये बांधण्याचा निर्णय का घेतला, कोणाच्या सांगण्यावरून हे केले, ही रुग्णालये खासगी मालकांच्या घशात का घालण्यात येत आहेत, असे सवालही युनियनचे अध्यक्ष जाधव यांनी केले आहेत. 

Web Title: Privatization of municipal hospitals? Municipal workers' union warns of agitation, possibility of patient services becoming expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.