Join us  

पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी; काँग्रेस अध्यक्षांनी जारी केली यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 7:25 PM

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कॅम्पेन समिती स्थापन केली असून या कमिटीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसही महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजापाविरुद्ध मैदानात उतरली आहे. भाजपााच्या विजयाचा महारथ रोखण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडीत शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जागावाटप केलं आहे. या जागावाटपात काँग्रेस नेमक्या किती जागा मिळतील हे अद्याप निश्चित झालं नाही. मात्र, काँग्रेसने ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून आजच चंद्रपूरमधील उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच, काँग्रेसकडून आगामी निवडणुकांसाठी प्रचार आणि व्यवस्थापनाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कॅम्पेन समिती स्थापन केली असून या कमिटीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने आणि काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या सहीने ही निवड करण्यात आली असून कॅम्पेन कमिटीमध्ये चेअरमन आणि ५७ सदस्य आणि १ समन्वयक असणार आहे. या कमिटीतील सदस्यपदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशील कुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांची नावे आहेत. 

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होत असलेल्या पाचपैकी ४ मतदारसंघांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरमधून आमदार विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदियामधून डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूरमधून डॉ. नामदेव किरसान या चार उमेदवारांची नावे आज रात्री काँग्रेसने जाहीर केली. चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव काँग्रेसने गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र, आजच चंद्रपूरमधील उमेदवाराच्या नावाचीही घोषणा होईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे, चंद्रपूरमधून निवडणुकांच्या रिंगणात कोण उतरणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यातच, आज काँग्रेसकडून कॅम्पेन कमिटीतील ६० जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसही डिजिटल जाहीर सभांसह कॅम्पेनवर भर देऊ शकते. मात्र, भाजपाच्या तुलनेत काँग्रेसचा सोशल मीडियावरील प्रचार कमी दिसून येत आहे. त्यामुळे, सोशल मीडियाच्या माध्यमातून नवयुवकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी काँग्रेसच्या कॅम्पेन कमिटीला अधिक प्रयत्न करावे  लागणार आहेत.  

चंद्रपुरातील उमेदवार आज ठरणार

दरम्यान, चंद्रपूर मतदारसंघामध्ये दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यात रस्सीखेच आहे. चंद्रपूरमध्ये पहिल्या टप्प्यातच मतदान आहे. त्यामुळे, आजच चंद्रपूरमधील उमेदवाराची घोषणा होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :काँग्रेसपृथ्वीराज चव्हाणनिवडणूकलोकसभा निवडणूक २०२४