Join us

'वित्तीय संस्थांच्या निधीतून कोस्टल रोडच्या कामाला प्राधान्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 03:50 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई : पायाभूत सुविधांच्या कामांसाठी वित्तीय संस्था निधी देतात. कोस्टल रोडच्या कामाला अशा निधीच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाईल. यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.सदस्य भास्कर जाधव यांनी मुंबई व कोकण पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी एका उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या विभागाच्या पर्यटन विकासाकरिता निधी उपलब्धतेसाठी एशिएन डेव्हलपमेंट बँकेकडे आराखडा सादर करण्यात आला होता. मात्र बँकेमार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या बाबींमध्ये पर्यटन ही बाब अग्रक्रमी नसल्याचे बँकेने कळविले आहे. कोकणच्या पर्यटन विकासासाठी आराखडा करण्यात आला असून स्थानिकांना रोजगार, समुद्र किनारे, हॉटेल याबाबत धोरण तयार करीत आहोत.मुंबई-गोवा महामागार्चे काम तसेच चिपी विमानतळ देखील सुरु होत आहे. त्यामुळे कोकणचा पर्यटन विकास याला प्राधान्य देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :अजित पवार