लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीए) विकसित केलेली मालवाहतूक मार्गिका एप्रिलपासून संपूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. यामुळे जेएनपीए बंदरातून दादरीसह देशातील विविध भागांपर्यंत जलद मालवाहतूक शक्य होणार आहे. या स्वतंत्र मार्गिकेमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील ताण कमी होणार आहे.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मालवाहतूक गाड्यांसाठी पश्चिम रेल्वेच्याप्रवासी मार्गिकांचा वापर केला जातो. दररोज सुमारे ५० ते ५५ मालगाड्या या मार्गावरून धावतात. त्यामुळे लोकल, तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत होता. मात्र, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (डीएफसीसीआयएल) द्वारे विकसित करण्यात आलेल्या या नव्या समर्पित मार्गिकेमुळे वसई रोड–कोपर विभागातील रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होईल. परिणामी लोकल आणि लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांसाठी अतिरिक्त क्षमतेचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती देण्यात आली.
जेएनपीएच्या या महत्त्वाकांक्षी मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. ते पूर्ण झाले असून त्याला आता मुहूर्त मिळणार आहे. सूत्रानुसार येत्या एप्रिलपासून पश्चिम रेल्वे मार्गिकेवरील गाड्या नव्या समर्पित मार्गिकेवरून धावणार आहेत. त्यामुळे देशभरातील मालवाहतूक अधिक सोयीची होणार आहे.
एप्रिलपासून नव्या प्रवासाला सुरुवात
एप्रिलपासून पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व मालवाहतूक गाड्या नव्या समर्पित मार्गिकेवर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे तत्काळ वक्तशीरपणात सुधारणा होणार असून, भविष्यात अतिरिक्त मेल आणि एक्स्प्रेस गाड्या वाढवण्यास मोठी मदत मिळणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, एक मालवाहतूक ट्रेन साधारण दीड एक्स्प्रेस गाडीइतकी लांब असते. त्यामुळे या मालगाड्या प्रवासी मार्गावरून हटविल्यास पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण नेटवर्कवरील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
नवीन टर्मिनस प्रगतिपथावर
पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरीप्रमाणे विविध ठिकाणी नवीन टर्मिनस उभारण्याचे काम सुरू आहे. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे यांसारख्या विद्यमान टर्मिनसची क्षमता वाढविण्यात येत आहे. याशिवाय पाचवी व सहावी मार्गिका उभारण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवर अधिक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे.
१,५०६ किमीचा कॉरिडॉर
१,५०६ किलोमीटर लांबीचा पश्चिम मालवाहतूक कॉरिडॉर जेएनपीटी ते उत्तर प्रदेशातील दादरीपर्यंत जोडला जाणार आहे. पश्चिम समर्पित कॉरिडॉर उत्तर प्रदेश (१८ किमी), हरियाणा (१७७ किमी), राजस्थान (५६५ किमी), गुजरात (५६५ किमी) आणि महाराष्ट्र (१७७ किमी) आहे.
Web Summary : The JNPA freight corridor, fully operational from April, will reduce pressure on Western Railway. This dedicated route will speed up freight transport, benefiting local and long-distance train schedules by reducing congestion.
Web Summary : अप्रैल से पूरी तरह से चालू होने वाला जेएनपीए फ्रेट कॉरिडोर, पश्चिमी रेलवे पर दबाव कम करेगा। यह समर्पित मार्ग माल परिवहन को गति देगा, जिससे भीड़ कम होने से स्थानीय और लंबी दूरी की ट्रेन समय सारणी को लाभ होगा।