Join us  

आरोग्य विम्याच्या अवाजवी दरवाढीला चाप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 5:46 PM

health insurance : फक्त पाच टक्के प्रिमियम वाढीला परवानगी

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमाणामुळे आर्थिक स्थिती खालावल्याचे कारण देत आरोग्य विमा क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी आपल्या प्रिमियमच्या रकमांमध्ये भरमसाठ वाढ केली होती. त्याबाबतच्या अनेक तक्रारी इन्शुरन्स रेग्युलेटरी अथाँरिटी आँफ इंडिया (आयआरडीएआय) यांच्याकडे दाखल झाल्यानंतर या कंपन्यांना प्रिमियमची रक्कम केवळ पाच टक्क्यांना वाढविण्याची किंवा कमी करण्याची मुभा देण्यात आली आहे.  

उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचे क्लेम लक्षणीयरित्या वाढत असल्याने विमा कंपन्यांच्या परताव्याच्या रकमांमध्येसुध्दा वाढ झाली आहे. आरोग्य विमा काढणा-यांचे प्रमाणही वाढत असले तरी जमा आणि खर्चाचा ताळेबंद बिघडल्याचा विमा कंपन्यांचा दावा आहे. भविष्यात हे संकट अधिक अधिक गडद होण्याची भीती कंपन्यांना वाटत  आहे. त्यामुळे आँक्टोबर महिन्यापासून अनेक विमा कंपन्यांनी आपल्या प्रमियमच्या रकमांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ही वाढ ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आरआयडडीएआयकडे दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत माध्यमांमध्ये प्रसिध्द होत असलेल्या वृत्तांची दखलही घेण्यात आली आहे.

३० सप्टेंबरपर्यंत ३८८ पैकी फक्त ५५ विमा योजनांच्या प्रिमयमच्या दरांमध्ये पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. उर्वरित अनेक कंपन्यांची वाढ त्यापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. प्रिमियमच्या दरांमध्ये वाढ करण्यापूर्वी आयआरडीएआची पूर्वपरवानगी क्रमप्राप्त असते. मात्र, जेमतेम पाच कंपन्यांनीच पाच टक्क्यांपर्यंत दरवाढीस परवानगी घेतल्याचे आयआरडीएआयने स्पष्ट केले आहे. ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत आरोग्य विमा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोणत्याही कंपनीला आपल्या प्रमियमच्या रकमांमध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

टॅग्स :आरोग्यमुंबईमहाराष्ट्र