Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन; सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 13:48 IST

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे कौतुक केलं आहे.

मुंबई- मनसे आणि भाजपचं  हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या. याबरोबरच भाजपवर तुटून पडा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्य बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. 

बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले. याबरोबरच भाजपवर तुटुन पडा, त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या, भाजप आणि मनसे यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे जनतेला दाखवा, आपली कामं लोकापर्यंत पोहोचवा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे. शिवसेनेने जे कडवं हिंदुत्व धारण केलेलं होतं, ते मुख्यमंत्र्यांचं कडवं हिंदुत्व राहिलेलं नाही. मुख्यमंत्री आता हिरवा शालू पांघरलेल्यांच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांचं हिंदुत्व नामोहरम झालेलं आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

सदाभाऊ खोत म्हणाले की, राज ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून ते तयार झालेलं रसायन आहे. हिंदुत्वाला फुंकर घालण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं आहे, त्याच्या आता ज्वाला भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये कोण कोण भस्म होतं, हे भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल, असंही सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितलं. 

टॅग्स :राज ठाकरेसदाभाउ खोत मनसे