खासगी इमारतींचे परिरक्षण बंधनकारक; धोकादायक इमारतींचा प्रश्न, महापालिका प्रशासनाकडून अहवाल सादर करण्याच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:16 IST2025-05-20T16:16:11+5:302025-05-20T16:16:48+5:30

यंदाही ३० दिवसांच्या आत इमारतींचे स्थैर्यता प्रमाणपत्र खासगी इमारतींनी सादर करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत.

Preservation of private buildings mandatory; Question of dangerous buildings, instructions to submit report from municipal administration | खासगी इमारतींचे परिरक्षण बंधनकारक; धोकादायक इमारतींचा प्रश्न, महापालिका प्रशासनाकडून अहवाल सादर करण्याच्या सूचना 

खासगी इमारतींचे परिरक्षण बंधनकारक; धोकादायक इमारतींचा प्रश्न, महापालिका प्रशासनाकडून अहवाल सादर करण्याच्या सूचना 

मुंबई : पालिकेने दर वर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली असून त्यात एकूण १३४ अति धोकादायक खासगी इमारती आहेत. पालिकेच्या अधिनियमनानुसार ३० वर्षापेक्षा अधिक वापरात असलेल्या खासगी इमारतीचे संरचनात्मक परीक्षण बंधनकारक आहे. त्यानुसार खासगी इमारतींचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी पालिकेतर्फे जाहीर केली जाते. दुरुस्ती न झाल्यास दरवर्षी यापैकी काही धोकादायक इमारती पाडून टाकल्या जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या धोकादायक इमारतींची संख्या कमी होत आहे. यंदाही ३० दिवसांच्या आत इमारतींचे स्थैर्यता प्रमाणपत्र खासगी इमारतींनी सादर करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत.

मुंबईत एकेकाळी धोकादायक इमारतींची संख्या मोठी होती. त्यामुळे पावसाळ्यात धोकादायक इमारत पडून दुर्घटना होण्याचे प्रमाणही अधिक होते. काही वर्षांपूर्वी पालिकेने धोकादायक इमारती पाडून टाकण्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती हाती घेतली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईला यश येत असून मुंबईत सध्या १३४ धोकादायक इमारती असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. दरम्यान, मुंबईतील १३४ धोकादायक इमारतींपैकी ५६ इमारतींची प्रकरणे न्यायालयात आहेत, तर १२ इमारतींच्या संरचनात्मक अहवालाबाबत रहिवाशांचे आक्षेप असल्यामुळे या इमारतींचे अहवाल तांत्रिक सल्लागार समितीकडे आहेत. त्यामुळे या १३४ इमारतींपैकी ७७ धोकादायक इमारतीत अद्याप रहिवाशांचे वास्तव्य आहे. या धोकादायक इमारती रिकाम्या करून पाडून टाकणे हे पालिकेपुढचे मोठे आव्हान आहे.

येथे एकही धोकादायक इमारत नाही
परळ, शिवडी, नायगाव, बोरिवली या भागात एकही धोकादायक इमारत नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने आकडेवारीतून केला आहे. 
गिरगाव, चर्नीरोड, मानखुर्द, गोवंडी भागात प्रत्येकी एक इमारत धोकादायक असल्याचे पालिकेच्या आकडेवारीत म्हटले आहे.

येथे सर्वाधिक धोकादायक इमारती
एम. पश्चिम (वांद्रे, खार पश्चिम)    १५
पी. दक्षिण (गोरेगाव पश्चिम)    १५
के. पूर्व (अंधेरी पूर्व)    ११
एन. (घाटकोपर)    ११
के. पश्चिम (अंधेरी पश्चिम)    १०
आर. दक्षिण (कांदिवली पश्चिम)    ८
आर. उत्तर (दहिसर)    ७


४०० हून अधिक इमारतींची घट 
सहा वर्षांपूर्वी ६१९ इतकी असलेली अति धोकादायक इमारतींची संख्या आता कमी झाली आहे. यातील काही इमारती पाडून टाकण्यात आल्या आहेत. मागील वर्षी १८८ इमारती अति धोकादायक आढळल्या होत्या. यंदाच्या सर्वेक्षणात ही संख्या कमी होऊन १३४ अति धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Preservation of private buildings mandatory; Question of dangerous buildings, instructions to submit report from municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.