Preference of students to BMM, BMS for degree admission | पदवी प्रवेशासाठी बीएमएम, बीएमएसला विद्यार्थ्यांची पसंती

पदवी प्रवेशासाठी बीएमएम, बीएमएसला विद्यार्थ्यांची पसंती

मुंबई : यंदा पदवी प्रवेशासाठी कला शाखेचा भाव वधारल्याचे पहिल्या गुणवत्ता यादीवरून स्पष्ट होत आहे. नामांकित महाविद्यालयांची कला शाखेची गुणवत्ता यादी नव्वदीपार तर काही ठिकाणी ९५ टक्क्यांच्या वर आहे. कला शाखेप्रमाणेच वाणिज्य व विज्ञान शाखेपेक्षा विद्यार्थ्यांनी सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांनाच यंदाही आपली पसंती दर्शविली आहे. बीएमएस, बीएमएम, बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी आयटी या अभ्यासक्रमांना पदवी प्रवेशासाठी प्राधान्य दिले आहे. यंदा बारावीचा निकाल वाढला असला तरी नव्वद टक्के गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयासाठी दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे.

कला शाखा आणि सेल्फ फायनान्सव्यतिरिक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी सीए (चार्टर्ड अकाउंटंट), सीएस (कंपनी सेक्रेटरी) यांसारख्या अन्य पर्यायांचाही विचार करावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे. बीबीआय (बॅचलर इन बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स), बीएएफ (बॅचलर इन अकाउंटिंग अ‍ॅण्ड फायनान्स), बीएफएम (बॅचलर इन फायनान्स मार्केट) यांसारखे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांची पसंती मिळवित आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा या अभ्यासक्रमांमुळे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण मिळत असल्याने त्यांच्याकडे ओढा वाढत आहे. नामांकित महाविद्यालयांच्या पारंपरिक आणि सेल्फ फायनान्स कोर्सेसचा कट आॅफ नव्वदीपार गेल्याने ८० ते ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता दुसºया गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे.
तसेच, विद्यार्थ्यांनी हमीपत्र फॉर्म भरून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी हमीपत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश निश्चित करून विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या मूळ प्रती सादर केल्यावर अंतिम प्रवेश दिला जाणार आहे. हे प्रवेश महाविद्यालयांनी आॅनलाइन करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यास प्रवेशासाठीच्या तांत्रिक सुविधेसाठी अडचणी आल्यास त्याने नजीकच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने या वर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आॅनलाइन अपलोड करण्याची सुविधा दिली आहे.

...तर आॅफलाइन प्रक्रिया राबवा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडचणी आल्यास व प्रतिबंधित क्षेत्रात मोडत नसल्यास सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून ते आॅफलाईन प्रक्रिया राबवू शकतात.स्थानिक जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्याही सूचना विद्यापीठामार्फत देण्यात आल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Preference of students to BMM, BMS for degree admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.