लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी रात्री ११ पासून मध्यरात्री एक वाजेपर्यंत कोसळणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने गुरुवारी दिवसभर विश्रांती घेतली. मुंबईचे आकाश दिवसभर काळंवडलेले असूनही पावसाने चकवा दिला. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आज, शुक्रवारी आणखी वाढेल. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह कोकणातील उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने बुधवारी संपूर्ण कोकण पट्ट्यासह मध्य महाराष्ट्राला हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. रात्री उशिरा मुंबईत ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी दिवसभर मुंबई शहर उपनगरावर पावसाचे ढग दिसत होते; पण पाऊस बेपत्ता होता.
शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मासेमारी करण्यासाठी मच्छीमारांनी समुद्रात उतरताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई हवामान खात्याच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी केले आहे.
रायगड, रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता शुक्रवारी वाढणार आहे. परिणामी संपूर्ण उत्तर कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ताशी ४० किमी वेगाने वारे वाहतील, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली.