“सहकार चळवळ सर्वसामान्यांची, ती सशक्त झाली पाहिजे, केंद्र सरकार ताकद देणार”: प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 03:55 PM2023-11-19T15:55:33+5:302023-11-19T15:56:37+5:30

येणाऱ्या काळात केंद्र सरकार या सहकाराला ताकद देणार हे आपल्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

pravin darekar said cooperative movement belongs to common people, it should be strengthened | “सहकार चळवळ सर्वसामान्यांची, ती सशक्त झाली पाहिजे, केंद्र सरकार ताकद देणार”: प्रवीण दरेकर

“सहकार चळवळ सर्वसामान्यांची, ती सशक्त झाली पाहिजे, केंद्र सरकार ताकद देणार”: प्रवीण दरेकर

मुंबई: मुंबई जिल्हा सहकारी बोर्ड, पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घाटकोपर येथे आज भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते 'सहकार सप्ताह' सोहळ्याचे उदघाटन पार पडले. यावेळी सहकार चळवळ ही सर्वसामान्यांची आहे. इथे कुणी टाटा, बिर्ला, अंबानी नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या या संस्था आहेत. त्यामुळे सहकार चळवळ सशक्त झाली पाहिजे, असे प्रतिपादन दरेकर यांनी केले. 

प्रवीण दरेकर म्हणाले की, सहकाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम संपन्न होतोय. सहकारासमोर अनेक अडचणी आहेत. महाराष्ट्राला सहकाराचे वैभव प्राप्त झालेय. ग्रामीण भागाचा विकास सहकारावर झाला. महाराष्ट्राच्या विकासातही सहकाराचे फार मोठे योगदान आहे. मुंबईतील सहकारी संस्थांनी येथील सर्वसामान्य लोकांना ताकद, आधार देण्याचे काम केले आहे. म्हणून या सगळ्या संस्था टिकल्या पाहिजेत, सशक्त झाल्या पाहिजेत यासाठी आपणच आपले संघटन मजबूत केले पाहिजे. याकरिता अशा प्रकारचे कार्यक्रम महत्वाचे असतात.

मुंबईत आपण सहकारातील एवढे कार्यकर्ते आहोत, सहकारी संस्था आहेत, १०० कोटीच्यावर उलाढाल करणाऱ्या अर्बन बँका आहेत, हौसिंग सोसायट्या आहेत. साधारण लाखोचे नेटवर्क या मुंबई शहरात असतानाही येथील आर्थिक व्यवस्थेवर आपले वर्चस्व नाही ही खंत माझ्यासारख्या सहकारातील कार्यकर्त्याला आहे. आपण अडचणीत आलो की राज्य शासनाकडे मदतीसाठी जातो. परंतु राज्यातील सहकारी संस्थांत एवढा पैसा आहे की सरकारच्या बजेटपेक्षा जास्त पैसे सहकारात आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

सहकारी संस्था, पतसंस्था, अर्बन बँकांचे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. हौसिंग सोसायट्यांचे प्रश्न आहेत. ग्राहक सहकारी संस्थाच्या माध्यमातून मुंबईत एकेकाळी एक ग्राहक आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून समन्वय साधून चळवळ होत होती. आज मुंबईत हातांच्या बोटावर मोजण्याइतपत ग्राहक सहकारी संस्था आहेत. याचे आपण आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही? बेरोजगारांच्या सहकारी संस्था झाल्या त्या किती ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत? या सर्व गोष्टींचे मूल्यमापन होऊन त्यांच्या अडचणी शोधून त्यावर उपाययोजना करत हे क्षेत्र मजबूत करण्याची जबाबदारी मुंबईसारख्या सहकारी बोर्डाने नेतृत्व करण्याची गरज आहे आणि त्यात्या संस्थांची फेडरेशन आहेत त्यांच्या मदतीने येणाऱ्या काळात आराखडा तयार करून आपल्याला भविष्यात काम करण्याची गरज असल्याचेही प्रवीण दरेकर म्हणाले.

मी बोलघेवडेपणा, भाषणबाजी करत नाही. विधिमंडळाच्या सभागृहात राज्याच्या सहकार चळवळीवर बाहेर ताशेरे ओढले गेले त्यावेळी सरकार कुठलेही असो तुटून पडण्याचे काम सहकारातील कार्यकर्ता म्हणून मी केले आहे. सहकार बदनाम करण्याचे काम जर कुणी करत असेल तर ते राज्यातील सहकारी कार्यकर्ता सहन करणार नाही अशा प्रकारची भुमिका घेऊन येणाऱ्या काळात आपल्याला काम करण्याची गरज असल्याचे दरेकर म्हणाले. यावेळी दरेकर यांनी अर्बन बँका, पतसंस्थांच्या विषयीही उपस्थितांना माहिती दिली. त्याचबरोबर अर्बन बँका, पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण गती घेत असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. 

जिल्हा बँकेचे नेतृत्व करत असताना सहकारी संस्थांना ताकद कशी देता येईल, सहकार चळवळ कशी बळकट करता येईल याचाच सातत्याने आमचा प्रयत्न असतो. हौसिंगसाठी सेल्फ डेव्हलपमेंट योजना आणली. बिल्डरशिवाय गृहनिर्माण संस्थांनी स्वतःची इमारत पुनर्विकास करावी यासाठी सेल्फ डेव्हलपमेंट संकल्पना आणली. आज आमच्याकडे सोळाशे प्रस्ताव आलेत. ३०-३२ प्रस्तावांना कर्ज मंजूर केले आहे. त्यातील सात ते आठ इमारती प्रत्यक्षात उभ्या राहिल्या आहेत. जिल्हा बँक जर ताकदीने पाठीशी उभी असेल तर हे अभियान पुढे गेले पाहिजे. सहकाराचा उपयोग अशा पद्धतीने करणार नसू आणि रुटीन सहकार घेऊन जाणार असू तर या बदलत्या युगातील स्पर्धेत टिकणार नाही. त्या दृष्टीने येणाऱ्या काळात काम करावे लागणार आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

येणाऱ्या काळात केंद्र सरकार या सहकाराला ताकद देणार

देशाचे सहकार मंत्री अमित शहा आहेत. ते सहकार मंत्री झाल्यानंतर देशातील सहकाराला वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळत आहे. अमित शहा सहकारातील छोट्या कार्यकर्त्यापासून जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. सहकाराची जाण असणारे राष्ट्रीय स्तरावरील ते सहकार मंत्री आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार या सहकाराला ताकद देणार हे आपल्या दृष्टीने महत्वाचे असल्याचेही दरेकर म्हणाले.


 

Web Title: pravin darekar said cooperative movement belongs to common people, it should be strengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.