पोलीस भरतीसाठी सरावादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन २२ वर्षीय प्रतीकचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 18:00 IST2022-11-15T17:59:47+5:302022-11-15T18:00:55+5:30
कोरोना काळानंतर पहिल्यांदाच राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी करत होता तयारी

पोलीस भरतीसाठी सरावादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन २२ वर्षीय प्रतीकचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): लवकरच पोलीस शिपाई पदाची भरती होणार आहे. याच भरतीची तयारी करणाच्या २२ वर्षीय तरुणाचा वसईत सरावा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना सोमवार घडली. या घटनेने वसई आणि विरारमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कोरोनाच्या नंतर पहिल्यांदा राज्यात पोलीस शिपाई पदाची भरती होणार आहे. त्यासाठी हा तरुण जिवतोड मेहनत करत होता. प्रतीक महेंद्र मेहेर असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या २२ वर्षीय तरुणाचे नाव असून तो मूळचा अर्नाळा किल्ल्यातील रहिवासी असुन वसईच्या रानगाव येथे राहत होता.
राज्यात सर्वात मोठी पोलीस शिपाई पदाची पोलीस भरती होणार असून या भरतीची ९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख आहे. या सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेत आपण भरती व्हावे यासाठी राज्यातील लाखो तरुण भरतीपूर्व सराव करत आहेत. असाच सराव वसईच्या रानगाव परिसरात प्रतीक हा करत होता. सोमवारी संध्याकाळी पाचच्या दरम्यान धावत असताना अचानक त्याच्या छातीत दुखायला लागले आणि काही वेळात त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस दलात भरती होण्यापूर्वीच वसईतील तरुणाचे स्वप्न भंगल्याने वसई, विरार, नालासोपारा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पण या तरुणांच्या मृत्यूची सरकार दखल घेऊन त्याच्या कुटुंबियांना मदत करेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सराव करणाऱ्या राज्यातील तरुणांनी जिथं शक्य असेल तिथे राज्यस्तरीय तसेच अॅथलेटीक्सशी संबंधित असलेल्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली सराव करावा. धावत असताना किंवा वॉर्म अपदरम्यान थांबावे आणि बसूनच पाणी प्यावे. छातीत कळ आल्यावर थोडी विश्रांती करावी, असे आवाहन अर्नाळा येथील मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल निनाद पाटील यांनी केले आहे.