Join us

विधान परिषद पोटनिवडणूक : प्रसाद लाड भाजपाचे अधिकृत उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 08:41 IST

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. यानुसार प्रसाद लाड सोमवारी सकाळी 11 वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत.

मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. यानुसार प्रसाद लाड सोमवारी सकाळी 11 वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.  पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

रविवारच्या बैठकीत प्रसाद लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी (27 नोव्हेंबर)रात्री महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदेखील उपस्थित होते. या बैठकीत प्रसाद लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातही फोनवरुन चर्चा झाली व शिवसेनेनंही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवल्याची माहिती आहे. 

नारायण राणेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. विधानसभेतील सदस्य या निवडणुकीसाठी मतदान करतील.  7 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान घेण्यात येणार असून संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

टॅग्स :प्रसाद लाडभाजपाशिवसेना