Join us

राज्यातील नेत्यांच्या सहीमुळे भडकले प्रकाश आंबेडकर; चर्चेआधीच विसंवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 07:45 IST

मविआतील जागावाटप : मनधरणीसाठी करावा लागला फोन

मुंबई : महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी दिलेल्या निमंत्रणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर चांगलेच भडकले होते. गुरुवारी मुंबईत मविआची बैठक होती. बैठकीला हजर राहावे असे पत्र आघाडीतर्फे आंबेडकरांना देण्यात आले होते. यावर काँग्रेसतर्फे नाना पटोले, राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील, तर शिवसेनेतर्फे संजय राऊत यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. जागावाटपाच्या चर्चेचे अधिकार पटोले यांना नाहीत, असा आक्षेप घेत आंबेडकर यांनी पटोले यांना खरमरीत पत्र लिहिले. 

आंबेडकरांची नाराजी दूर

आंबेडकरांच्या नाराजीनंतर जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन केला, तेव्हा कॉन्फरन्स कॉलवर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलाही होते. महाराष्ट्रात जागावाटपाची बोलणी करण्याचे अधिकार बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहेत, आपण पुढच्या बैठकीत सहभागी व्हावे अशी विनंती चेन्नीथली यांनी आंबेडकर यांना केली. आंबेडकरांनीही ही विनंती मान्य करत मविआच्या पुढच्या बैठकीत उपस्थित राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नाना पटोलेंचे अधिकार काढले?

वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात जागावाटपाची बोलणी करण्याचे अधिकार बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना देण्यात आल्याचे चेन्नीथली यांचा हवाला देऊन म्हटले आहे. त्यामुळे पटोले प्रदेशाध्यक्ष असून त्यांना हे अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पटोलेंचे अधिकार काढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरमहाविकास आघाडी