Join us  

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 6:36 AM

मनसुख हिरेन हत्या प्रकरण

ठळक मुद्देएनआयएने प्रदीप शर्मासह सोनी व मोटेकर यांना ११ जून रोजी अटक केली. सोमवारी शर्मा यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अँटिलिया स्फोटक कार प्रकरण आणि ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेला माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आनंद जाधव व संतोष शेलार या दोघांनाही १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर मनीष सोनी आणि सतीश मोटेकर यांच्या एनआयए कोठडीत १ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

एनआयएने प्रदीप शर्मासह सोनी व मोटेकर यांना ११ जून रोजी अटक केली. सोमवारी शर्मा यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारच्या सुनावणीत शर्माचे वकील सुदीप पासबोला यांनी तळोजा कारागृहात शर्माच्या जीवाला धोका असल्याने ठाणे कारागृहात रवानगी करण्याची विनंती न्यायालयाला केली. शर्मा अनेक प्रकरणांत तपास अधिकारी होते. अटक करण्यापूर्वी त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. याचा अर्थ त्यांच्या जीवाला धोका आहे, असे पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर एनआयएने आपल्याला काहीही आक्षेप नसल्याचे म्हटले. मात्र, अंडरट्रायल्सला कोणत्या कारागृहात पाठवावे, याचा निर्णय कारागृह प्रशासन घेत असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने तळोजा कारागृहाच्या अधीक्षकांना शर्माने केलेल्या आरोप विचारात घेऊन आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले. ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्माला अटक करण्यात आली होती. हिरेन हत्येप्रकरणात शर्मा मास्टरमाइंड असल्याचा संशय एनआयएला असून पुरावे हाती लागल्यावर अटक केली.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस