Join us  

'धनुष्यबाण चोरला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबत', नागपूरचा युवा नेता ठाकरेंसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 4:38 PM

आज मातोश्रीवर पोहोचल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हाती भगवा या समर्थकांनी दिला.

मुंबई - राज्यातील शिवसेनेचा राजकीय संघर्ष विकोपाला गेला असून शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्ष निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे, ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष राज्यात आणि शिवसेनेत निर्माण झाला असून तो दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या दोन्ही पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक शिवसैनिक मातोश्रीवर जात आहेत. तर, शिंदेंच्या शिवसेनेतही अनेकजण प्रवेश करत आहेत. नुकतेच नागपुरातील काहींनी नागपूर रामटेक ते मातोश्री मुंबई असा पायी प्रवास केला. आज मातोश्रीवर पोहोचल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हाती भगवा या समर्थकांनी दिला. यावेळी, उद्धव ठाकरेंनी स्वागतपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.    

सध्याच्या काळात नागपूरहून मुंबईत मातोश्रीवर पायी येणं हे अवघड नाही, तर अशक्य आहे. पण, तुम्हाला वाटलं की इथं यावं, माझ्यासोबत उभं राहावं, हा मी रामाचा आशीर्वाद मानतो. कारण, तुम्ही निघालात रामटेकवरुन आणि पोहोचलात आज राम नवमीदिवशी, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नागपुरातून मातोश्रीवर भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. यावेळी, शिंदे गटावरही निशाणा साधला. 

काही काळासाठी त्यांनी धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभू श्रीराम हे माझ्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. रामसेतू बांधताना रामांसोबत वानरसेना तर होतीच, पण प्रत्येकानं आपला वाटला उचलला. एका खारीनेही तिचा वाटा उचलला होता. तसेच, मी काय करू शकतो, तर आपण सर्व जिवंत माणसं एकत्र आलो तर लंकादहन नक्कीच करू शकतो, असा मंत्रही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला. 

दरम्यान, युवा-परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ राम मंदिर (रामटेक) ते मातोश्री (कलानगर) दरम्यान आयोजित केलेल्या महाभारत यात्रेची सांगता आज झाली. यावेळी त्यांनी रामटेक येथून आणलेला भगवा ध्वज उद्धव ठाकरेंना सुपूर्द करून यात्रेचा हेतू सफल केला. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनानागपूरमुंबई