प्रभादेवी पूल ५० दिवसांत भुईसपाट; ‘एमएमआरडीए’चे नियोजन, नवीन सेतूचे बांधकाम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:05 IST2025-10-13T14:04:15+5:302025-10-13T14:05:46+5:30
अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना थेट वरळी व पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्रेकडे जाता यावे, यासाठी ४.५ किमी लांबीचा उन्नत मार्ग ‘एमएमआरडीए’ बांधत आहे.

प्रभादेवी पूल ५० दिवसांत भुईसपाट; ‘एमएमआरडीए’चे नियोजन, नवीन सेतूचे बांधकाम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यावर भर
अमर शैला -
मुंबई : अटल सेतूची थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेच्या उभारणीसाठी प्रभादेवी (एल्फिन्स्टन) रेल्वे स्थानकावरील पुलाचे काम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार ५० दिवसांत पाडकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेत प्रभादेवी स्थानकाच्या भागात दुमजली पुलाची उभारणी केली जाणार आहे. स्थानिक वाहतुकीसाठी रेल्वे मार्गिकेवर एक पूल, तर त्यावरून वरळी-शिवडी उन्नत मार्गिका जाईल.
रेल्वे वाहतुकीमुळे मर्यादा
सध्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांचे तोडकाम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून मुख्य पूल जात आहे.
या दोन्ही मार्गांवर सातत्याने उपनगरी गाड्या धावत असल्याने मर्यादित वेळेत पुलाचे पाडकाम करावे लागत आहे.
अस्तित्वातील पुलावरील काँक्रीटचे ब्लॉक काढण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर पुलाचा सांगाडा काढला
जाणार आहे.
अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना थेट वरळी व पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्रेकडे जाता यावे, यासाठी ४.५ किमी लांबीचा उन्नत मार्ग ‘एमएमआरडीए’ बांधत आहे.
पुलाची डेडलाइन अशी
या पुलाचे पाडकाम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा ‘एमएमआरडीए’चा प्रयत्न
आहे. जानेवारीपासून प्रत्यक्षात नव्या पुलाचे बांधकाम सुरू
होईल. वरळी-शिवडी उन्नत मार्गावरील प्रभादेवी पुलाची सर्व कामे सप्टेंबर २०२६ मध्ये पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘केईम’, ‘वाडिया’, ‘टाटा’कडे जाण्यासाठी मोठा वळसा
सध्या दादर आणि करी रोड पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा प्रभादेवी पूलच हा वाहतुकीसाठी होता, मात्र, वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी हा पूल पाडला जात आहे.
त्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद केल्याने या भागातील रहिवाशांना पूर्वेकडे केईम रुग्णालय, वाडिया रुग्णालय आणि टाटा रुग्णालयात जाण्यासाठी मोठा वळसा पडत आहे.
परिणामी या पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करावे,
अशी मागणी होते आहेत. ‘एमएमआरडीए’ने या पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करून हा पूल वर्षभरात वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन केले आहे.