एमएचटी सीईटी परीक्षेवेळी बत्ती गुल; ५-६ तास विद्यार्थी केंद्रातच ताटकळून बसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 06:23 IST2025-04-21T06:22:26+5:302025-04-21T06:23:04+5:30

कुर्ल्याच्या केंद्रावरील विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, सीईटी सेल पुन्हा घेणार परीक्षा

Power went out during MHT CET exam; students sat in the center for 5-6 hours | एमएचटी सीईटी परीक्षेवेळी बत्ती गुल; ५-६ तास विद्यार्थी केंद्रातच ताटकळून बसले

एमएचटी सीईटी परीक्षेवेळी बत्ती गुल; ५-६ तास विद्यार्थी केंद्रातच ताटकळून बसले

मुंबई - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेदरम्यान कुर्ला येथील एका केंद्रावर ऐन परीक्षेवेळी वीजपुरवठा खंडित झाला. विजेच्या सततच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांना ५ ते ६ तास परीक्षा केंद्रातच बसून राहावे लागले. सकाळच्या सत्रात अनेक विद्यार्थी पूर्ण पेपर सोडवू शकले नाहीत. तर दुपारचे सत्रही उशिरा सुरू झाले.  त्यामुळे सीईटी सेल ही परीक्षा पुन्हा घेणार आहे. 

इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या परीक्षेचे एक केंद्र कुर्ला पूर्वेकडील आकार कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आले होते. या केंद्रावर ६२ विद्यार्थी होते. पहिल्या सत्रात सकाळी ९ ते १२ या वेळेत परीक्षा होती. परीक्षा सकाळी ९ वाजता सुरू झाली खरी, मात्र वीजपुरवठा खंडित होत होता. त्यातून संगणकांत बिघाड झाला. काही वेळाने जनरेटर मागविण्यात आला. मात्र, दुपारी २ वाजेपर्यंत परीक्षा सुरळीत झाली नाही.

पुनर्परीक्षेचा पर्याय
अन्य परीक्षा केंद्रांवर कोणतीही अडचण आली नाही. एका केंद्रावर अर्धा ते पाऊण तास वीजपुरवठा खंडित झाल्याने कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाला होता. त्यातून काही विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या. परिणामी या केंद्रातील सकाळच्या सत्रातील परीक्षा पुन्हा घेतली जाईल. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय दिला जाईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली. त्याचे सुधारित प्रवेशपत्र आज, २१ एप्रिलला विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल, असेही सीईटी सेलने जाहीर केले आहे.

परीक्षा केंद्र होते पत्र्याच्या खोलीत
परीक्षा केंद्रात सकाळी ८ वाजल्यापासून होते. परीक्षा केंद्र सिमेंटच्या पत्राच्या खोलीत होते. सातत्याने लाईट ये-जा करत असल्याने एससीही बंद होते. परीक्षेची वेळ उलटून गेल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने आम्ही तणावाखाली आलो होतो. त्यातच वीजेच्या या गोंधळात माझ्यासह अनेक विद्यार्थी पूर्ण पेपर सोडवू शकले नाहीत, अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली. 

दुपारचे सत्रही विलंबाने
या सर्व गोंधळामुळे दुपारच्या सत्रातील परीक्षाही जवळपास अर्धा तास विलंबाने सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच सीईटी कक्षाने दोन अधिकाऱ्यांना या परीक्षा केंद्रावर पाठविले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Power went out during MHT CET exam; students sat in the center for 5-6 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा