समृद्धीच्या इंटरचेंजजवळ मोकळ्या जागेत विजेची निर्मिती, ४० कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 02:46 PM2024-03-09T14:46:57+5:302024-03-09T14:50:23+5:30

वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत उभारण्यात येणाऱ्या या सौरऊर्जा प्रकल्पातून नऊ मेगावॉट विजेची निर्मिती होणार असून, भविष्यात याच विजेतून समृद्धी महामार्गावरील दिवेही प्रकाशमय केले जाणार आहेत.

Power generation in open space near Samriddhi Interchange, costing Rs.40 crores | समृद्धीच्या इंटरचेंजजवळ मोकळ्या जागेत विजेची निर्मिती, ४० कोटींचा खर्च

समृद्धीच्या इंटरचेंजजवळ मोकळ्या जागेत विजेची निर्मिती, ४० कोटींचा खर्च

मुंबई : समृद्धी महामार्गालगत इंटरचेंजजवळ आता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) उपकंपनी असलेल्या महासमृद्धी रिनिवेबल एनर्जी लिमिटेडला (एमआरईएल) यासाठी कंत्राटदार मिळाला असून, त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यात आहे.

वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत उभारण्यात येणाऱ्या या सौरऊर्जा प्रकल्पातून नऊ मेगावॉट विजेची निर्मिती होणार असून, भविष्यात याच विजेतून समृद्धी महामार्गावरील दिवेही प्रकाशमय केले जाणार आहेत. नागपूर ते मुंबई असा ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा ग्रीन महामार्ग म्हणून विकास करण्याचा प्रयत्न एमएमआरडीसीकडून सुरू आहे. त्यासाठी या मार्गावरील इंटरचेंज आणि अन्य ठिकाणच्या मोकळ्या जागांवर सौर प्रकल्प उभारून त्यातून वीज निर्मिती केली जाणार आहे. यातून जवळपास १३८ मेगावॉट इतक्या विजेची निर्मिती शक्य आहे. तसेच हरित ऊर्जेला चालना देण्याचा मानस आहे. यातील पहिल्या टप्प्यात आता वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील भिलखेडाजवळ पाच मेगावॉट आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील फैजपूर येथे चार मेगावॅटचा प्रकल्प उभारला जाणार आहे. जवळपास २५ ते २७ एकर एवढ्या क्षेत्रावर हा प्रकल्प साकारला जाणार आहे.

४० कोटींचा खर्च
या दोन्ही प्रकल्पांसाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एमएसआरडीसीला पुढील वर्षापासून वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही वीज महावितरण कंपनीला ३.०५ रुपये ते ३.१० रुपये एवढ्या रकमेला विकली जाणार आहे. यातून एमएसआरडीसीला उत्पन्नाचा नवा मार्गही मिळेल. तसेच भविष्यात एमएसआरडीच्या रस्त्यांवरील विजेची गरजही भागविणे शक्य होणार आहे.

Web Title: Power generation in open space near Samriddhi Interchange, costing Rs.40 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.