मुंबई : पवई तलावात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे गाळ व जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे जीवाणूंचीही वाढ झाली आहे. त्यामुळे पवई तलावाच्या पाण्याचा दर्जा खालावल्याची कबुली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. विधानसभेत अर्णीचे आमदार राजू तोडसाम यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, वाढत्या जलपर्णीमुळे तलावातील मगर, मासे, पक्षी व इतर जलचर प्राण्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार २०२२मध्ये मुंबई महापालिकेने तलावातील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले. तर, तलावात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबतची कार्यवाही पालिका स्तरावर सुरू आहे. पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी व ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी येथे वायुविजन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तर, राष्ट्रीय तलाव संरक्षण योजनेंतर्गत गणेश घाट व पवारवाडी परिसरात सुशोभीकरणाचे काम केले आहे, अशी माहिती दिली आहे.
झोपड्या हटवण्याचे निर्देशमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या ठाणे शहरातून जातात. या जलवाहिन्यांना ठाण्यापासून मुलुंडपर्यंत अनधिकृत झोपड्यांनी विळखा घातला आहे. या एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
मुंबई पालिकेने जलवाहिन्यांच्या दोन्ही बाजूस १० मी. अंतरापर्यंतच्या झोपड्यांचे निष्कासन करण्याबाबत ठाणे पालिकेस कळविले आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बोरीवलीचे आ. संजय उपाध्याय यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.