सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नागरिकांचे ‘खड्डेमुक्तमुंबई’चे स्वप्न कागदावरच राहणार असल्याचे खड्ड्यांच्या वाढत्या संख्येवरून दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांत पालिकेकडे खड्ड्यांच्या १० हजार तक्रारी व्हाॅट्सॲप, ट्विटर, तसेच ॲपद्वारे आल्या आहेत. त्यात केवळ ऑगस्टच्या २० दिवसांतील तीन हजारांहून अधिक तक्रारींचा समावेश आहे. सर्वाधिक तक्रारी या ‘एस’ वॉर्डमधील भांडुप, नाहूर, विक्रोळी तसेच मुलुंड, अंधेरी, विलेपार्ले पूर्व येथील नागरिकांनी नोंदवल्या आहेत. रस्त्यांवरून चालणे, वाहन चालवणेही अवघड झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांवरून पालिका प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागते. ‘खड्डेमुक्त मुंबई’साठी पालिकेने रस्त्यांचे काँक्रिटीकरण दोन टप्प्यांत हाती घेतले आहे. टप्पा १ आणि २ मधील मिळून जवळपास ४९ टक्के काँक्रिटीकरण ३१ मे पूर्वी झाले आहे. त्यामुळे यंदा खड्ड्यांच्या संख्येत तसेच खड्डे भरण्याच्या खर्चात मोठी कपात होईल, असा दावा पालिकेने केला. मात्र खड्ड्यांच्या वाढत्या तक्रारी पालिकेसाठी आव्हानात्मक आहेत.
‘या’ भागांत खड्डेच खड्डे
भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, विलेपार्ले पूर्व, जेबी नगर, चार बंगलो, गिल्बर्ट हिल, वर्सोवा, विद्याविहार, घाटकोपर, मालवणी, मढ, मार्वे रोड, बोरीवली, कुलपवाडी, वजिरा नका, मुलुंड, नाहूर या भागात सर्वाधिक खड्डे आहेत. त्यामुळे तेथील नागरिक त्रासले आहेत.
बजेट वाढवावे लागणार?
यंदा खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने ७९ कोटींची निविदा काढली. ही निविदा मागील वर्षीपेक्षा जवळपास ६० टक्क्यांनी कमी आहे. मात्र, दोन महिन्यांत पडलेल्या खड्ड्यांच्या संख्येवरून पालिकेला हे बजेट पुन्हा वाढवावे लागणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे पालिकेने यंदा मास्टिक अस्फाल्ट वापरून खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आहे.
खड्ड्यांमुळे भरपावसात वाहतुकीत अडथळे
- १८ ऑगस्ट - वाकोला पुलावरील वाहतूक संथ
- २८ जुलै - बीकेसी कनेक्टर येथे वाहतूक कासवगतीने
- १६ जुलै - जोगेश्वरीच्या आय. बी. पटेल येथे वाहतूक कोंडी
- १ जुलै - हब मॉलजवळील पश्चिम द्रूतगती मार्गावरील वाहतूक संथ
- खड्ड्यांच्या एकूण तक्रारी - १०,७७५
- ‘पॉटहोल क्विकफिक्स’वरील तक्रारी - ८,४४१
- ‘व्हाॅट्सॲप’वरील - १,५०८
- ‘ट्विटर’वरील - १११
- इतर - १,९१६
- ऑगस्टमधील तक्रारी - ३,३२८
- सोडवलेल्या एकूण तक्रारी - ९,१९६
- खड्डे बुजवणे बाकी - १,५७९
- इतर प्राधिकरणांच्या हद्दीतील खड्डे - ७५२
विक्रोळी परिसरात पावसाच्या पाण्याने बरीच वाताहत झाली आहे. मात्र, खड्ड्यांमुळे येथील वाहतूककोंडीत भर पडली आहे. प्रवास जीवघेणा ठरत आहे.- प्रशांत पालव, रहिवासी, टागोरनगर, विक्रोळी