मुंबई : ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरू असून, ३४२ रहिवाशांना डिसेंबरमध्ये त्यांच्या स्वप्नातील घर देण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडातर्फे मंगळवारी रहिवाशांना देण्यात आली. बीडीडी चाळ पुनर्विकास समिती आणि रहिवाशांसोबत झालेल्या आढावा बैठकीत म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी म्हाडाचे अधिकारी विनायक आपटे आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे, ज्ञानेश्वर तेजम यांच्यासह रहिवासी उपस्थित होते.पहिल्या टप्प्यातील प्रत्येक पुनर्वसन इमारतीच्या बांधकामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच अंतर्गत बदलासाठी काही सूचना रहिवाशांनी केल्या. २४ तास पाणी, गॅस पाइपलाइन जोडणी, खिडक्यांना लोखंडी ग्रिल बसवणे, पार्किंग व्यवस्था या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. स्वतंत्र पार्किंग, घरभाडे वाढीसंदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे यावेळी म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांनी स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यातील इमारतींची कामे वेगाने पुनर्विकासातील पहिल्या टप्प्याच्या इमारतीचे काम जलदगतीने सुरू आहे. सातपैकी दोन इमारतींमधील ३४२ रहिवाशांना डिसेंबर २०२५ पर्यंत ताबा देण्यात येईल. उर्वरित पाच विंगमधील रहिवाशांना मार्च २०२६ नंतर टप्प्याटप्प्याने ताबा दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष बांधकामाला या महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. संक्रमण शिबिरे उपलब्ध नसल्यामुळे रहिवाशांनी घरभाडे घेऊन प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहन म्हाडाने केले.