मुंबईच्या वांद्रे टर्मिनसमध्ये एका ५५ वर्षीय महिलेवर एका हमालाने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात हमालाचं काम करणाऱ्याने महिलेवर अत्याचार केले. आरोपीला पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. पीडित महिला ही आपल्या जावयासह मुंबई पाहण्यासाठी आली होती. मात्र मुंबईत रात्री उशीरा पोहोचल्यामुळे तिला विश्रांतीची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे पीडितेने आणि जावयाने रात्रीचा मुक्काम वांद्रे स्थानकावरच करण्याचा निर्णय घेतला. टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६-७ वर पीडित महिला झोपलेली असताना आरोपीने पीडित महिलेला जवळच उभ्या असलेल्या लांब पल्ल्याच्या रेल्वेत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची तक्रार रेल्वे पोलिसांत केली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. त्यानंतर रविवारी सकाळी आरपीएफ आणि जीआरपीने आरोपीला अटक केली. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.