आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावणार पोर्टेबल हॉस्पिटल; जे. जे.सह इतर सरकारी मेडिकल कॉलेजांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:13 IST2025-02-26T09:13:50+5:302025-02-26T09:13:57+5:30

पोर्टेबल हॉस्पिटलचा हा संच या चार रुग्णालयांना दिला जाणार असून आपत्ती व्यवस्थापन, महसूल,वनविभाग यांच्या निधीतून  खर्च करण्यात येणार आहे. 

Portable hospital to help disaster victims; J. J. and other government medical colleges included | आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावणार पोर्टेबल हॉस्पिटल; जे. जे.सह इतर सरकारी मेडिकल कॉलेजांचा समावेश 

आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावणार पोर्टेबल हॉस्पिटल; जे. जे.सह इतर सरकारी मेडिकल कॉलेजांचा समावेश 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडली की तेथील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने लष्कराचे वैद्यकीय पथक रवाना केले जाते. हे पथक दुर्घटनास्थळीच एका तंबूत तात्पुरत्या स्वरूपाचे हॉस्पिटल उभारून जखमींवर उपचार करते आणि पुढील उपचारांसाठी जिल्हा व तत्सम रुग्णालयात जखमींची रवानगी करते. याच धर्तीवर आता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांना पोर्टेबल हॉस्पिटलचा संच देण्यात येणार आहे. त्यात जे. जे. हॉस्पिटलसह नागपूर, नांदेड, कोल्हापूर येथील सरकारी मेडिकल कॉलेजांचा समावेश आहे.

पोर्टेबल हॉस्पिटलचा हा संच या चार रुग्णालयांना दिला जाणार असून आपत्ती व्यवस्थापन, महसूल,वनविभाग यांच्या निधीतून  खर्च करण्यात येणार आहे. 

१२ कोटींचा खर्च            
वर उल्लेखलेल्या पोर्टेबल हॉस्पिटल संचाची किंमत १२.२० कोटी रुपये आहे. तसेच संचाची उपयुक्तता व आवश्यकता वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रमाणित केल्यानंतर अहवालाच्या आधारावर आणखी १२ रुग्णालयांना हा संच देण्यात येणार आहे.

सद्य:स्थितीत राज्यातील काही मेडिकल कॉलेजांमध्ये इमर्जन्सी मेडिसिन विभाग सुरू करण्यात आला आहे. त्या विषयातील डॉक्टर या कामासाठी वापरणे शक्य होणार आहे. त्यासोबत अन्य शाखेतील डॉक्टरही अशावेळी मदत करू शकतात.

दुर्घटनास्थळी रुग्णांना उपचार देण्यासाठी हा संच दिला जाईल. लष्कराच्या पोर्टेबल रुग्णालयासारखे छोट्या आकाराचे हे संच असून, त्यास १०० चौरस फुटांची जागा लागते. हा संच दुर्घटनास्थळी नेऊन त्यात कोणत्या प्रकारची औषधे, उपकरणे ठेवणार आहेत, त्यावर त्याची उपयुक्तता ठरते.  हेलिकॉप्टरमधूनही घटनास्थळी नेला जाऊ शकतो.                
- राजीव निवतकर, 
आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग

Web Title: Portable hospital to help disaster victims; J. J. and other government medical colleges included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.