Join us

बंदर विभाग उभारणार वेसाव्यात मासेमारी बंदर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 16:19 IST

या अनुषंगाने सरकारने मासेमारी बंदर उभारण्यासाठी ३३९ कोटींचा निधी आणि २०१९ मध्ये या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

मुंबई : मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या वेसावे कोळीवाड्यातील मासेमारी बंदर उभारण्याचे काम राज्याच्या परिवहन आणि बंदरे विभागाकडे सोपविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. बंदराअभावी येथील मासेमारी व्यवसाय डबघाईला जात आहे. या अनुषंगाने सरकारने मासेमारी बंदर उभारण्यासाठी ३३९ कोटींचा निधी आणि २०१९ मध्ये या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

हा प्रकल्प महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळामार्फत होणार होता. मात्र, तीन वर्षे ओलांडूनही या प्रकल्पाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याची बाब वेसावा कोळी जमात ट्रस्टने मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणली होती. या बंदराची गरज आणि आवश्यकता मत्स्यउद्योग विकासासाठी आवश्यक असल्याची बाब खासदार गजानन कीर्तीकर यांनीही यावेळी लक्षात आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाकडे दिलेले बंदर उभारण्याचे काम त्यांच्याकडून काढून राज्याच्या परिवहन आणि बंदर विभागाकडे दिले.

वेसावा खाडीतील गाळ काढण्याची प्रक्रिया मागील पाच ते सहा वर्षांपासून प्रलंबित असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्यावर त्यांनी मत्स्य व्यवसायाचे प्रभारी प्रधान सचिव अतुल पाटणे यांना तत्काळ काम सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी बंदर आणि परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी बंदर उभारण्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा आणि तांत्रिक ज्ञान आमच्या परिवहन व बंदर विभागाकडे असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उभारणे शक्य असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यामुळे सुविधा मिळणार आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेमच्छीमार