सार्वजनिक गणेशोत्सवासाठीही तोच नियम, पीओपीच्या मूर्तींना बंदी; मनपाचं परिपत्रक जारी, वाचा सगळे नियम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:14 IST2025-02-21T11:13:14+5:302025-02-21T11:14:45+5:30
माघी गणेशोत्सवावेळी पीओपी मूर्तींना विसर्जनासाठी बंदी घालण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनात वाद निर्माण झाला होता.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठीही तोच नियम, पीओपीच्या मूर्तींना बंदी; मनपाचं परिपत्रक जारी, वाचा सगळे नियम...
माघी गणेशोत्सवावेळी पीओपी मूर्तींना विसर्जनासाठी बंदी घालण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनात वाद निर्माण झाला होता. आता माघी प्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सवावरही कोर्टाच्या नियमांचे सावट निर्माण झाले आहे. कारण कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. सार्वजनिक उत्सव सन २०२५ पर्यावरणपूरक पद्धतीने तसेच सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने, मूर्तीकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरीता आणि विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे मार्गदर्शनाकरिता काही सूचना करण्यात आल्या आहेत. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा असं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवावतही पीओपी मूर्तींना पूर्णपणे बंदी असेल हे स्पष्ट झालं आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या म्हणजेच POPच्या मूर्तींवर पूर्णपणे बंदी असेल असं परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे. कोर्टाच्या नियमांचे पालन करूनच मूर्ती घडवावी असे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत. तसंच मंडप उभारण्यासाठी रस्ते आणि फूटपाथवर खड्डे केल्यास प्रतिखड्डा २ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात येणार आहे.
परिपत्रकातील काही ठळक मुद्दे...
१. मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल PIL 96 of 2024 मधील दिनांक 30.01.2026 रोजीच्या अंतरीम आदेशानुसार, पीओपी मुर्तीना पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले असून केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दि. 12.05.2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिलेले आहेत. सदर आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
२. मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यास प्रोत्साहन मिळावे याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुर्तीकारांना निःशुल्क मंडप परवानगी दिली जाईल.
३. सार्वजनिक / खाजगी जागेवरील मंडपांकरीता अर्ज सादर करतेवेळी गतवर्षीची मंडप परवानगी सोबत जोडण्यात यावी.
४. मूर्तीकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते आणि फूटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध असून खड्डे खणल्याचे आढळून आल्यास 2000 रुपये प्रत्ती खड्डा याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
५. येथे केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडविल्या जातात असा फलक, मंडपाच्या प्रवेश व्दारावरील दर्शनी भागात्त सुस्पष्ट दिसेल अशा रितीने प्रदर्शित करावा.
६. उत्सवा वादरम्यान मूर्तीचे आगमन आणि विसर्जन सुकर होईल व स्थापनेदरम्यान मूर्तीचे स्थैर्य राहिल एवढया उंचीची मूर्ती घडविण्यात यावी.