Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा खेडकरला दणका, प्रशिक्षण थांबवले, अकादमीत परत बोलावले; मसुरीत आठवडाभरात हजर व्हा, राज्य सरकारने दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 03:54 IST

सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मंगळवारी यासंदर्भातील पत्र जारी केले.

मुंबई : खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावणे, गाडीवर दिवा लावून फिरणे, पुणे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे अँटी चेंबर बळकावणे यामुळे वादग्रस्त ठरलेल्या परिविक्षाधीन अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी रोखण्याचा  निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मंगळवारी यासंदर्भातील पत्र जारी केले. त्यांना मसुरीतील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीत कोणत्याही परिस्थितीत  २३ जुलै २०२४ पूर्वी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पूजा खेडकर या २०२३ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. मार्च २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती  पुण्यात परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली होती. पुण्यात रुजू झाल्यानंतर  त्यांनी  स्वतंत्र दालन, गाडी आणि शिपाई या सुविधांची मागणी केली होती. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरचा ताबा घेतला होता.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध मानसिक छळ केल्याची तक्रार

वाशिम : पूजा खेडकर यांची वाशिम उपविभागीय पोलिस अधिकारी नीलिमा आरज व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत रविवारी रात्री १० वाजेदरम्यान शासकीय विश्रामगृह येथे तीन तास बंदद्वार चर्चा झाली हाेती. 

त्यावेळी खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध मानसिक छळ केल्याची तक्रार दिल्याची माहिती आहे. याबाबत बोलण्याची परवानगी नसल्याचे वाशिम पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितले. ‘माझ्या काही अडचणींसंदर्भात चर्चा करण्यासाठी पोलिसांना बाेलाविले होते,’ असे खेडकर यांनी रविवारी बोलताना सांगितले होते.

पूजा खेडकर वाशिममधून अखेर कार्यमुक्त

वाशिम : बनावट कागदपत्र देऊन आयएएस अधिकारी झाल्याचा आरोप होत असतानाच आता प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण आठवडाभर थांबविण्यात आले आहे. तसे पत्र मिळाल्यानंतर वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मंगळवार, १६ जुलै रोजी दुपारीच कार्यमुक्त केले.

पुढे काय होऊ शकते?

पूजा खेडकर यांची आता मसुरीच्या राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीतर्फे चौकशी केली जाईल. पूजा यांच्याविरुद्ध ज्या तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारींची चौकशी ही अकादमी करेल.

एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले की परिविक्षाधीन आयएएस अधिकाऱ्यासाठी असलेल्या अटी आणि शर्तींचा पूजा यांनी भंग केला का तसेच त्यांच्या वर्तनाने प्रशासकीय सेवेची बदनामी झाली का या मुद्द्यावर ही चौकशी केंद्रित असेल. त्यात त्या दोषी आढळल्या तर त्यांची सेवा समाप्त केली जाईल. दोषी आढळल्या नाही तर त्यांचा परिविक्षाधीन कालावधी पुढे सुरू ठेवला जाईल.

अकादमीने केली परत पाठविण्याची सूचना

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रशिक्षण अकादमीचे उपसंचालक शैलेश नवल यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी तातडीने थांबवून त्यांना प्रशिक्षण अकादमीत पाठवावे, अशी सूचना केली होती.

त्यांना तातडीने कार्यमुक्त करावे तसेच २३ जुलैआधी अकादमीत हजर होण्याचे निर्देश द्यावेत, असेही अकादमीने पत्रात म्हटले आहे. त्यानुसार राज्य सरकारने खेडकर यांचा वाशिम येथील प्रशिक्षणार्थी कालावधी रोखण्याचा निर्णय आज घेतला.

टॅग्स :पूजा खेडकरपुणे