Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस पडल्यानंतर प्रदूषणात वाढ; मॉर्निंग वॉक ठरतोय धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 09:49 IST

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीलाच पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या हवेत ओलावा कायम असून, त्याने प्रदूषकांना पकडून ठेवले आहे. त्यात भर म्हणून की काय वाहणारे वारेही स्थिर आहेत. या दोन प्रमुख कारणांमुळे शनिवारी आणि रविवारी पहाटे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील हवा अत्यंत प्रदूषित नोंदवण्यात आली. पुढील दोन दिवसदेखील नागरिकांना भल्या पहाटे प्रदूषकांचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये वर्ष संपताना बऱ्यापैकी थंडीचा जोर होता. अधून-मधून किमान तापमानात चढ-उतार नोंदविले जात होते. त्यातच उत्तर भारतात झालेल्या हवामान बदलाचा परिणाम म्हणून पाऊस पडला.

अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी

हवेतील ओलाव्यामुळे वाहनांतून निघणारा धूर, बांधकामांमुळे उडणारी धूळ आणि धुके यांच्या संयुक्त मिश्रणातून तयार होणारे धुरके जखडून ठेवले. त्यामुळे शनिवारी दिवसभर आणि रविवारी सकाळी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरला होता. रविवारी दुपारीपर्यंत धुरके होते. परिणामी  ठिकठिकाणी दृश्यमानता कमी झाली होती.

मुंबई ठाणे आणि नवी मुंबईमध्ये वरच्या स्तरावर प्रदूषण नोंदविले जात आहे. पुढील दोन दिवस हे प्रदूषण कायम राहील.  जोपर्यंत हवेतील ओलावा कायम असेल, तोवर नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागेल तसेच तापमानही कमी होणार नाही. हवेतील ओलावा कमी झाल्यानंतर वारे वेगाने वाहतील, तेव्हाच प्रदूषके वाऱ्यासोबत वाहून जातील.  पुढील १० दिवस तरी  थंडी जाणवणार नाही. त्यानंतर मात्र  तापमानात किंचित घट होईल, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.

बांधकामे, वाहतूक समस्या, वाहनांची वाढलेली संख्या आणि उद्योग हे मुंबईतील हवा प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. धूलिकण २.५ आणि १० ची प्रचंड वाढ झाली आहे. ओझोन प्रदूषणसुद्धा वाढत आहे. दमा आणि फुफ्फुसाच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी वृक्षलागवड, बांधकाम धूळ कमी करणे आणि पेट्रोल, डिझेल वाहने बंद करून सोलर आणि बॅटरी वाहने सर्वत्र वाढविली पाहिजेत. - प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी 

English
हिंदी सारांश
Web Title : Post-Rain Pollution Spike: Morning Walks Become Hazardous in Mumbai

Web Summary : Mumbai's air quality plummeted after recent rains trapped pollutants, exacerbated by stagnant winds. Visibility decreased due to smog. Experts recommend reducing dust, increasing green cover and switching to electric vehicles to combat pollution and improve health.
टॅग्स :मुंबईप्रदूषण