Join us  

प्रदूषित मुंबई; हवेच्या गुणवत्तेला ठेंगा; महापालिका अर्थसंकल्पात ठोस सुधारणा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 2:03 AM

पर्यावरणप्रेमींची खंत

मुंबई : मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करत, मुंबईत नागरी वनाचे आच्छादन वाढविण्यात येणार आहे. उद्यानांच्या प्रगतिपथासाठी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात २५४.१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात ठोस अशी कोणतीच सुधारणा, तरतूद केलेली नाही, अशी खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन दल आणि पर्यावरण अशा विभागांसाठी महापालिकेने रकमेच्या तरतुदीही केल्या. उद्यानांच्या कामाच्या प्रगतीसाठीही ठोस तरतुदी केल्या. मात्र दिल्लीप्रमाणेच मुंबईच्या हवेची गुणवत्ताही ढासळत आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल, माझगाव, अंधेरीसह चेंबूर येथील हवेची गुणवत्ता दिवसागणिक ढासळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली बांधकामे, सुरू असलेली रस्त्यांची कामे, रस्त्यांवर दिवसागणिक वाढत असलेली वाहने आणि त्यातून निघणारा धूर; अशा अनेक घटकांमुळे मुंबई प्रदूषित होत आहे. विशेषत: ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वातावरणातील धूळीकणांचे प्रमाण वाढत आहे. रस्त्याच्या कामांदरम्यान उडणारी धूळ कमी करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस अशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, वातावरणातील धूळीचा मुंबईकरांना त्रास होत आहे.

विशेषत: मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र ‘स्वच्छ हवा कृती आराखडा’ याबाबत प्रशासनाने ढिसाळ धोरण अवलंबल्याने ठोस अशी कार्यवाही होताना दिसत नाही, अशीही खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

अर्थसंकल्प काय म्हणतो?

पुलाखालील जागा सौंदर्यीकरणासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.सागरी रस्त्यामुळे हरित पट्टा उपलब्ध होईल.बॅकबे रिक्लेमेशन, कफ परेड येथे उद्यान विकसित करण्याचे नियोजित आहे.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ठोस अशा तरतुदी नाहीत. कंपन्यांकडून होणारे प्रदूषण, बांधकामांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस अशी नियमावली तयार केली पाहिजे. या माध्यमातून कार्यवाही अपेक्षित आहे. मात्र असे काहीच करण्यात येत नाही. परिणामी, अर्थसंकल्पाने नाही म्हटले तरी निराशा केली आहे.- भगवान केशभट, संस्थापक-अध्यक्ष, वातावरण फाउंडेशन

टॅग्स :पर्यावरणमुंबई महानगरपालिकामुंबईमहाराष्ट्र