Join us  

मुलाखतीच्या आड राजकारण; फडणवीस-राऊत भेटीने भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 6:08 AM

गुप्तता बाळगत पंचतारांकित हॉटेलमध्ये अडीच तास चर्चा

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यावर सातत्याने तोफ डागणारे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी स्रेहभोजन घेतले. भेटीबाबत गुप्तता बाळगत अडीच तास पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चा केली. शिवसेनेच्या मुखपत्रात फडणवीस यांनी द्यावयाच्या मुलाखतीचे प्रारुप ठरविण्यास ही भेट असल्याचे अधिकृतपणे सांगितले गेले पण यावेळी राजकीय चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

नोव्हेंबरमधील बिहार विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस मुलाखत देणार असतील तर प्रारुप ठरविण्यास तीन महिने आधी गुप्त बैठक कशाला, असा प्रश्न निर्माण झाला. या भेटीनंतर भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेला उधाण आले. ‘शिवसेनेला पुन्हा आलिंगन देणार का’ ‘महाविकास आघाडीचे शिल्पकार आता युतीचे शिल्पकार’ अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटल्या. ही गुप्त नव्हे; तर जाहीर भेट होती, असा खुलासा राऊत यांनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ही भेट मुलाखतीचे प्रारुप ठरविण्यास होती. भेटीला राजकीय संदर्भ नव्हता, असा खुलासा केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, अशा भेटी होतातच. अंतर्विरोधामुळे हे सरकार पडणार असेच मी व फडणवीस गेले काही दिवस म्हणत आहोत.अनकट मुलाखत अन् फडणवीस यांचा कॅमेराबिहार विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या मुखपत्रासाठी फडणवीस यांनी मुलाखत द्यावी, असे आजच्या भेटीत ठरले. ही मुलाखत अनकट, अनएडिटेड प्रसिद्ध केली जाईल आणि राऊत मुलाखत घेताना सोबत फडणवीस यांनी सोबत आणलेल्या कॅमेऱ्यात ती टिपली जाईल, अशा दोन अटी फडणवीस यांनी टाकल्या त्या राऊत यांनी मान्य केल्या.

टॅग्स :देवेंद्र फडणवीससंजय राऊतभाजपा