स्वतःच्या प्रकल्पांना राम कुटीर नाव का दिलं नाही?; केईएमचे नाव बदलण्यावरुन अमोल कोल्हेंचा लोढांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:34 IST2026-01-24T12:28:59+5:302026-01-24T12:34:30+5:30
‘केईएम’ नावातील एडवर्ड काढून टाकण्याची सूचना मंत्री लोढांनी दिल्यानंतर अमोल कोल्हेंनी जोरदार टीका केली.

स्वतःच्या प्रकल्पांना राम कुटीर नाव का दिलं नाही?; केईएमचे नाव बदलण्यावरुन अमोल कोल्हेंचा लोढांना सवाल
Amol Kolhe On KEM Hospital: मुंबईतील ऐतिहासिक आणि लाखो रुग्णांसाठी आधार असलेल्या के. ई. एम. रुग्णालयाच्या नावावरून आता नवा राजकीय वाद पेटला आहे. रुग्णालयाच्या नावातील राजे एडवर्ड हे नाव गुलामगिरीचे प्रतीक असून ते बदलण्यात यावे, अशी सूचना मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. लोढांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले मंगल प्रभात लोढा?
सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या १०० व्या वर्धापन दिन सोहळ्यात लोढा बोलत होते. यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला. के. ई. एम.मधील राजा एडवर्ड हे नाव गुलामगिरीचे प्रतीक आहे. त्यामुळे हे नाव बदलावे. एडवर्ड नाव कायम ठेवण्याची काय गरज आहे? भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाला १०० वर्षांपेक्षा जास्त काळ गुलाम बनवले, त्यांची पूजा करण्याची गरज नाही. देशात जिथे गरज आहे तिथे गुलामीची प्रतीके पुसून स्वाभिमानाची नावे दिली जात आहेत. राजे एडवर्ड हे नाव गुलामगिरीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते बदलले जावे. याबाबत मुंबई महानगरपालिका योग्य तो निर्णय घेईल," असे विधान लोढा यांनी केले.
खासदार अमोल कोल्हेंचा 'लोढा प्रकल्पांवर'वरून टोला
लोढा यांच्या विधानाचा समाचार घेताना अमोल कोल्हे यांनी त्यांच्या बांधकाम व्यवसायाचा संदर्भ देत थेट सवाल उपस्थित केले. "मंगलप्रभात लोढा यांना या संस्थेचा इतिहास नीट माहिती नसावा. पारतंत्र्याच्या काळासुद्धा केवळ भारतीय डॉक्टरच असावेत हे अमलात आणणारे हे केईएम रुग्णालय आहे. मुंबईत फक्त पाच वैद्यकीय महाविद्यालये मुंबई पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यातील चारची स्थापना १९५० पूर्वी झाली. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षाच्या काळात आपण केवळ एका मेडिकल कॉलेजची भर घालू शकलो आहे. मंगलप्रभात लोढा यांनी याचा विचार करायला हवा. नाव बदलणे हा भावनिक मुद्दा असू शकतो पण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची वस्तूस्थिती काय आहे याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबईतील लोकसंख्या २ कोटी आहे आणि उपलब्ध बेडची संख्या ५० हजार आहे. यातील केवळ १५ हजार बेड हे महापालिकेच्या रुग्णालयातील आहेत," असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
"मंगलप्रभात लोढांनी निवासी डॉक्टरांशी जरा संवाद साधला असता तर त्यांच्या अडचणी, कामाचा ताण याची माहिती मिळाली असती. पालकमंत्र्यांनी सांगितले की हे नाव परके आहे. मंगलप्रभात लोढा हे बांधकाम व्यावसायिक आहेत. मुंबईत त्यांच्या अनेक खुणा बघायला मिळतात. त्यांच्या प्रकल्पांची नावे लोढा बेलमोंडो, लोढा बेलाजिओ, अल्टामाऊंट, कासा बेला, ट्रम्प टॉवर अशी आहेत. मग ही नावे कुठल्या मातीतील आहेत. त्याऐवजी तुम्ही राम कुटीर, सीता सदन, लक्ष्मी निवास अशी आपल्या मातीमधील नावे का नाही ठेवली. सर्वसामान्यांसाठी असलेल्या रुग्णालयाच्या नावाची तुम्हाला अॅलर्जी आहे. नावं बदलण्याऐवजी त्या दर्जाची आणखी रुग्णालये उभी करा तेव्हा त्यांना हवी ती नावं द्या," असंही अमोल कोल्हे म्हणाले.
केईएमचा १०० वर्षांचा वारसा
मुंबईतील परळ भागात असलेले के. ई. एम. रुग्णालय हे आशियातील सर्वोत्तम सार्वजनिक रुग्णालयांपैकी एक मानले जाते. १९२६ मध्ये सुरू झालेल्या या रुग्णालयाने नुकतीच १०० वर्षे पूर्ण केली आहेत. अशा ऐतिहासिक संस्थेच्या नावाशी छेडछाड करण्यावरून आता मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.