पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत रंगणार राजकीय लढत, मातब्बरांची उमेदवारी जवळपास निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 02:42 AM2019-08-11T02:42:00+5:302019-08-11T02:42:14+5:30

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात या वेळीही दुरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.

The political rivalry between the traditional rivals | पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत रंगणार राजकीय लढत, मातब्बरांची उमेदवारी जवळपास निश्चित

पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत रंगणार राजकीय लढत, मातब्बरांची उमेदवारी जवळपास निश्चित

Next

- जमीर काझी

मुंबई : अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात या वेळीही दुरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. मुंबईत केवळ नावापुरते अस्तित्व असलेल्या राष्टÑवादीची धुरा सोपविण्यात आलेले माजी मंत्री नवाब मलिक आणि लोकसभेच्या निवडणुकीत घवघवीत यशामुळे आत्मविश्वास दुणावलेले शिवसेनेचे विद्यमान आमदार तुकाराम काते यांच्यात लढत रंगेल, अशीच सध्याची स्थिती आहे.

सर्वधर्मीय आणि मध्यम वर्गीयांची वस्ती असलेल्या या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने वॉर्डनिहाय संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. सेनेबरोबर युती होण्याचे जवळपास निश्चित असल्यामुळे सेनेच्या वाटेला हा मतदारसंघ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून फारसा जोर लावला जाणार नाही. नवाब मलिक यांना कॉँग्रेससह मनसेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. बहुजन वंचित आघाडीने उमेदवार उभा केल्यास त्यांच्या अडचणीत भर पडेल.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघातील मतदारांची संख्या साडेतीन लाखांवर आहेत. त्यापैकी महिलांची संख्या १ लाख ७५ हजार आहे. लोकसभा निवडणुकीत या ठिकाणाहून दुसऱ्यांदा बाजी मारताना राहुल शेवाळे यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे सेनेचा उत्साह दुणावलेला आहे. त्याउलट विरोधकांची अवस्था आहे. त्यामुळे २०१४ पेक्षा जास्त मताधिक्य मिळण्याचा आशावाद विद्यमान आमदारांना आहे.

२००९च्या निवडणुकीत राष्टÑवादी-कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार नवाब मलिक यांनी झालेल्या मतदानापैकी ३५.३२ टक्के मते घेतली होती. मलिक यांच्या विजयात मनसेचे उमेदवार नवीन आचार्य (१६,७३७) यांनी घेतलेली मते निर्णायक ठरली होती. त्याच्या उलट परिस्थिती मागच्या निवडणुकीत झाली. आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढविल्याने मलिक यांना त्याचा फटका बसला. कॉँग्रेसचे उमेदवार राजेंद्र माहुलकर यांना साडेसतरा हजार तर भाजपच्या विठ्ठल खरातमोल यांना साडेतेवीस हजारांवर मते मिळाली होती.

गेल्या वेळी ‘एमआयएम’चा उमेदवार रिंगणात होता, मात्र त्याचे फारसे अस्तित्व जाणवले नव्हते. एमआयएम अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित आघाडीत सहभागी असल्याने त्यांनी उमेदवार उभा केल्यास मलिक यांना त्यांचा फटका बसेल, अशी चिन्हे आहेत. मुस्लीमबरोबरच दलित मतेही काही प्रमाणात वंचित आघाडीकडे वळतील.
(उद्याच्या अंकात वाचा - वर्सोवा विधानसभा मतदारसंघ)

गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि युतीला मिळणाºया वाढत्या जनाधारामुळे निवडणुकीचा निकाल सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही. आपण पुन्हा विक्रमी मतांनी विजयी होऊ. उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील.
- तुकाराम काते, आमदार

सत्तेत असूनही विद्यमान आमदाराने मतदारसंघात काहीही काम केलेले नाही. त्यामुळे जनता त्यांना कंटाळली असून निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. पक्षाने आपल्यावर मुंबईची जबाबदारी सोपविली असली तरी या मतदारसंघात पूर्वी केलेली विकासकामे आणि मतदारांच्या सातत्याने संपर्कात असल्याने उमेदवारी दिल्यास नक्कीच विजयी होऊ.
- नवाब मलिक, अध्यक्ष, मुंबई राष्टÑवादी कॉँग्रेस
 

Web Title: The political rivalry between the traditional rivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.