Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तो लीलावती रुग्णालयात दाखल आहे. मुंबई पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानवर धारदार वस्तूने सहा वार केले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी सैफ अली खानने त्याच्याशी झटापट केली. त्यावेळी त्याने धारदार वस्तूने हल्ला केला ज्यामुळे जखमी झाला. याप्रकरणी ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी गंभीर आरोप केला आहे. मुंबईत कोण सुरक्षित आहे असा सवाल प्रियांका चतुर्वेदी यांनी केला.
एका अज्ञात हल्लेखोराने मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गुरुवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या घरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घुसून चाकूने हल्ला केला. यावेळी सैफने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. वांद्रे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या हल्ल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
हा प्रकार लाजिरवाणा - प्रियांका चतुर्वेदी
"मुंबईत पुन्हा एकदा हाय-प्रोफाइल व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न होणे किती लाजिरवाणे आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याने पुन्हा एकदा मुंबई पोलिस आणि गृहमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोठ्या व्यक्तींना लक्ष्य करून मुंबईला कमजोर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे हे दाखवणाऱ्या अनेक घटनांनंतर हे घडले आहे. बाबा सिद्दीकीजी यांच्या धक्कादायक हत्येनंतर त्यांचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. सलमान खानला बुलेटप्रूफ घरात राहण्यास भाग पाडले गेले. आता ते सैफ अली खान सोबत असं घडलं. सर्वजण वांद्रे येथे आहेत. असा परिसर जिथे सर्वाधिक सेलिब्रिटींची संख्या आहे, जिथे पुरेशी सुरक्षा असायला हवी. जर सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? सैफ अली खान लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा," असं प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं.
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनीही प्रतिक्रिया दिली. "सैफ अली खानवरील हल्ला चिंतेचा विषय आहे कारण जर इतक्या उच्च दर्जाच्या सुरक्षा असलेल्या लोकांवर त्यांच्या घरात हल्ला होऊ शकतो, तर सामान्य नागरिकांचे काय होऊ शकते? गेल्या काही वर्षांत सौम्यतेमुळे महाराष्ट्रात कायद्याची भीती कमी झालेली दिसते," असं क्लाईड क्रॅस्टो म्हणाले.
सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचे अतुल लोंढे म्हणाले. सुरक्षेत राहणारे सलमान खान आणि सैफ अली खान सारखे लोक जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय होणार? असा सवाल अतुल लोंढे यांनी केला आहे.