दहीहंडी सराव शिबिरात 'प्रचारजोर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 06:57 IST2025-08-11T06:56:39+5:302025-08-11T06:57:10+5:30
उत्सवाच्या निमित्ताने युवा मतदारांना आकर्षित करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न

दहीहंडी सराव शिबिरात 'प्रचारजोर'
मुंबई: आगामी महापालिका निवडणुका नरजेसमोर असतानाच गोकुळाष्टमीचा उत्साह शहरभर पसरला आहे. त्यामुळे युवा मतदारांना साद घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सणाचा राजकीय वापर करण्याची आखणी केल्याचे चित्र दिसत आहे. यंदा गोपाळकाल्याच्या आधीचा शेवटचा 'सुपर संडे' साधत, दहीहंडी सराव शिबिरांच्या निमित्ताने एकप्रकारे जाहीर प्रचाराला सुरुवात केली.
शिबिरांमध्ये पथकांना 'मान' आणि 'धन' दोन्ही मिळत असल्या त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. शिंदेसेनेतर्फे लोअर परळ येथे रविवारी शिबिर घेण्यात आले. यामध्ये पहिल्या पारितोषिकासाठी ५५ हजार ५५५ रुपये, तर दुसऱ्यासाठी २२ हजार २२२ रुपये जाहीर करण्यात आले.
गौतमी पाटील यांचा नृत्य कार्यक्रम रंगला
विशेष आकर्षण म्हणून नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम रंगला. मनसेचे शाखाध्यक्ष नीलेश इंदप, भाजपचे नीलेश मानकर आणि उद्धवसेनेचे हर्षल पळशीकर यांनी अनुक्रमे लोअर परळ व दादर पश्चिम येथे सराव शिबिरे आयोजित केली होती.
मुंबई महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार तरुणांमध्ये चर्चेत राहण्यासाठी सण-उत्सवाचा वापर प्रसिद्धीसाठी करत आहेत. सराव शिबिरांमध्ये पारंपरिक महिला-पुरुष गोविंदांसह फिरते मानवी मनोरे, पथनाट्य करणारे गोविंदा, तसेच दृष्टिहीन गोविंदांच्या पथकांना विशेष आमंत्रणे दिली जात आहेत.
या पथकांना नेत्यांच्या दहीहंडी उत्सवात खास सन्मान केला जात असून, विशेष चषक, आकर्षक टी-शर्ट, नाश्ता, पाणी, बसभाडे आणि मानधनाची सोय केली जाते. काही पथकांसाठी 'ब्रँडेड' टी-शर्टवर पक्षाचा लोगो व संदेश छापून तरुण मतदारांमध्ये ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रंगीबेरंगी प्रचार फलकांमुळे निवडणुकीची चाहूल
गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा माहोल चढत असून, सण शहरात पद्धतीने अनुभवायला मिळत आहे. गोविंदांच्या आरोळ्या, ढोल-ताशांचा निनाद आणि रंगीबेरंगी प्रचार फलकांनी मुंबईच्या गल्लीबोळांत निवडणुकीची चाहूल लागली आहे.