आमदारांच्या रिक्त प्रभागांत महिला उमेदवार, राजकीय पक्षांकडून शोध मोहिमेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:59 IST2025-11-15T12:54:44+5:302025-11-15T12:59:09+5:30
BMC Election 2025: मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेले पाच नगरसेवक पुढे आमदार झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर आता नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे पाचपैकी चार आमदारांचे वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाले असून, सर्व पक्षांमध्ये महिला उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे.

आमदारांच्या रिक्त प्रभागांत महिला उमेदवार, राजकीय पक्षांकडून शोध मोहिमेला सुरुवात
मुंबई - मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेले पाच नगरसेवक पुढे आमदार झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर आता नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे पाचपैकी चार आमदारांचे वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाले असून, सर्व पक्षांमध्ये महिला उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रभाग क्रमांक १६३ चे मनसेचे तत्कालीन नगरसेवक दिलीप लांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. चांदिवली मतदारसंघातून विजय मिळवत ते आमदार झाले. पुढे पक्ष फुटीनंतर शिंदेसेनेमधून पुन्हा याच मतदारसंघातून ते विजयी झाले. प्रभाग क्रमांक १३२ चे भाजप नगरसेवक पराग शाह यांनीही २०१९ व २०२४ या दोन्ही विधानसभा निवडणुका लढवत सलग विजय मिळवला. प्रभाग क्रमांक २११ मधील समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी भिवंडी पूर्व मतदारसंघातून २०१९ व २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवून आमदारपद मिळवले.
आरक्षणामुळे वॉर्डाचे चित्र बदलले
उद्धवसेनेचे प्रभाग क्रमांक ७७ मधील माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी २०२४ मध्ये जोगेश्वरी विधानसभेतून विजय मिळवला. तर, प्रभाग ८१ चे भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांनी शिंदेसेनेतून अंधेरी पूर्वमधून विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळविला.
आ. शेख यांचा पूर्वीचा ओबीसी वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. आ. लांडे, आ. पटेल, आ. नर, आ. शाह यांचे प्रभाग सर्वसाधारण महिला प्रर्वगासाठी आरक्षित झाल्याने येथे त्या-त्या पक्षांना महिला उमेदवार शोधावे लागणार आहेत.