Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 06:56 IST

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप की अजित पवार याचा होणार फैसला, ठाणे, नवी मुंबईबद्दलही कमालीची उत्सुकता; नागपूर कोणाचा गड, छत्रपती संभाजीनगर शहरावर कोणाचा वरचष्मा राहणार हेही ठरणार, नाशकात राजी नाराजीचा कसा फटका बसणार याकडेही मतदारांचे लक्ष

मुंबई : राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ईव्हीएम मशीनमध्ये गुरुवारी बंद होणार आहे. मुंबई महापालिका कोणाची उद्धव व राज या ठाकरे बंधूंची की भाजप व शिंदेसेनेची तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका भाजपची की अजित पवार-शरद पवार या जोडीची याचा फैसला मतदार करणार आहेत. 

राज्यातील २९ महापालिकांपैकी सर्वाधिक उत्सुकता आहे ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची. १९ वर्षानंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू जिंकतील की भाजप आणि शिंदेसेनेला मुंबईकर कौल देतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्कवरील या दोन प्रमुख विरोधकांच्या सभा झाल्या त्यात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर झेंडा फडकविण्यासाठी दोन्ही बाजूंनी जिवाचे रान केले. त्यातच काँग्रेसने स्वबळाचा नारा देत लढत दिली. मुंबईत अत्यंत अटीतटीची लढत बघायला मिळत आहे. मराठी मतदारांवर मुख्यत्वे भिस्त असलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीला भाजपविरोधी मतदार आपल्याभोवती केंद्रित होईल, असा विश्वास आहे. तर सर्वच भाषिक मतदार आपल्याला विकासाच्या मुद्यावर भक्कम पाठिंबा देतील, असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यत्वे रस होता तो पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत. या निवडणुकीने राज्यासमोर एक वेगळेच समीकरण आणले. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या दोन ठिकाणी एकत्र आल्या त्या भाजपच्या विरोधात. गेल्यावेळी दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता होती. आता पुणेकर भाजपला साथ देतात की पवार पुतण्या-काकांच्या जोडीला पसंती देतात हा प्रचंड औत्सुक्याचा विषय आहे.

नागपूर महापालिका हा भाजपचा गड मानला जातो. तेथे भाजप अनेक वर्षांपासून सलग सत्तेत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन दिग्गज नेत्यांचे नेतृत्व आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची पिढी मागे पडली असली तरी नवीन पिढीतील नेते भाजपला पराभूत करण्यासाठी सरसावले आहेत. अंतर्गत गटबाजी ही चंद्रपूर आणि अमरावती महापालिकेत भाजपसाठी डोकेदुखी असली तरी या गटबाजीला शेवटच्या टप्प्यात आम्ही अटकाव केला, असा दावा भाजप संघटनेतील ज्येष्ठ पदाधिकारी करत आहेत. विविध पक्षांमधील लहानमोठ्या नेत्यांनी केलेल्या पक्षांतरामुळे निवडणूक गाजली ती नाशिक महापालिकेची. भाजपअंतर्गत मोठे रुसवेफुगवे बघायला मिळाले. तरीही नाशिकमध्ये भाजपची ताकद मोठी आहे. अशावेळी राजीनाराजीचा भाजपला फटका बसतो की त्यावर मात करत पक्ष जिंकतो याचा निकाल १६ जानेवारीला येईल.

नांदेडचा किंग कोण...? 

आणखी एक महत्त्वाची महापालिका म्हणजे छत्रपती संभाजीनगर. तेथे भाजप आणि शिंदेसेनेची युती होऊ शकली नाही. उद्धवसेना आणि एमआयएम स्वबळावर लढत आहेत. काही जागांवर काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी तर काही जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट) अशी युती आहे. या महापालिकेवर अनेक वर्षे शिवसेनेचा झेंडा राहिला आहे. आता कौल कोणाला याविषयी कमालीची उत्सुकता आहे.

भाजप आणि शिंदेसेनेतच अटीतटीची लढत असलेल्या दोन महापालिकांमधील लढतीही महत्त्वाच्या आहेत. त्यात एक आहे नवी मुंबई ई तर दुसरी कल्याण-डोंबिवली. नवी मुंबईत एकनाथ शिंदे वरचढ की भाजपचे मंत्री गणेश नाईक ? आणि कल्याण डोंबिवलीत प्राबल्य शिंदेंचे की रवींद्र चव्हाणांचे याचा फैसला होणार आहे. 

माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये वर्चस्व राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदाच भाजपचे नेते म्हणून मतदारांना सामोरे जात असताना 'पक्ष कोणताही असला तरी नांदेडचा किंग मीच' हे सिद्ध करू शकतील का, याकडेही लक्ष लागले आहे.

दुबार मतदारांच्या नावासमोर (**) चिन्ह

महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले होते. घरोघरी जाऊनही त्यांची पडताळणी करून ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आला आहे.

त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु काही कारणाने असा अर्ज भरून घेतला नसल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे.

विधानसभेच्या मतदार याद्या धरल्या ग्राह्य 

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांसाठी वापरल्या जातात. संबंधित कायद्यातील तरतुर्दीनुसार राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभाजित केल्या आहेत. या याद्यांतील नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही; परंतु त्यातील दुबार नावांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे.

'मताधिकार' मोबाइल अॅप

मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 'मताधिकार' हे मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहे. ते सध्या फक्त 'गुगल प्ले स्टोअर'वरून डाऊनलोड करता येईल. या अॅपद्वारे मतदाराचे नाव शोधण्यासाठी मतदाराला दोन पर्याय उपलब्ध आहेत.

याचबरोबर आपल्या प्रभागातील उमेदवाराविषयी अधिक माहितीदेखील जाणून घेता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून दिले आहे. त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून अॅपप्रमाणे 'नाव' किंवा 'मतदार ओळखपत्रा'चा (ईपीआयसी) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी प्राधान्य 

मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्या बाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॉपची तसेच व्हीलचेअरचीही व्यवस्था असेल. विजेची, पाण्याची, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध असेल.

पिंक मतदान केंद्र

महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी व पोलिस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र 'पिंक मतदान केंद्र' म्हणून ओळखले जाईल.

मोबाइलवर बंदी 

मोबाइलवरून मतदान केंद्रांवर सुरक्षा कर्मचारी आणि मतदारांचा नेहमी वाद होतो. तो लक्षात घेता आयोगाने यासंदर्भात स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Key leaders' fate sealed in EVMs; Mumbai election crucial.

Web Summary : Maharashtra's municipal elections see key leaders' fate decided. Mumbai eyes Thackeray brothers versus BJP-Shinde. Pune and Pimpri-Chinchwad witness Pawar's challenge to BJP's reign. Nagpur, a BJP stronghold, faces Congress challenge. All eyes on results.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६उद्धव ठाकरेराज ठाकरेदेवेंद्र फडणवीस