मुंबई : पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला असला तरी मातृभाषा मराठीच्या मुद्द्यावरुन राजकीय रान धगधगत आहे. अशात शेअर बाजारातील व्यावसायिक सुशील केडिया यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टॅग करीत थेट आव्हान देणारे ट्विट केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच उद्धवसेना आणि मनसेने शनिवारी मुंबईत आयोजित केलेल्या विजयोत्सव मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर मातृभाषा मराठीवरून राज्यात पुन्हा एकदा रणकंदन सुरू आहे.
या विजयी मेळाव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी जरूर विजय मेळावा घ्यावा, आम्ही घेतलेल्या निर्णयांचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतोय. पण हिंदी सक्तीसाठी समिती करणारे, त्या समितीत आपल्या उपनेत्याला टाकणारे, पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी सक्तीचा करा ही त्या समितीची शिफारस स्वीकारणारे आता विजयी मेळावा घेणार आहेत. कोण दुटप्पी आहे हे मराठी माणसाला लक्षात येते, अशी टीका फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केडिया यांनाही फटकारले. मी मराठी शिकणार नाही हे अत्यंत उद्दामपणे सांगणे चुकीचे नाही का? असा सवाल त्यांनी केला.
राज ठाकरे हे लक्षात ठेवा, मराठी शिकणार नाही, क्या करना है बोल?
शेअर मार्केटमधील 'केडियोनॉमिक्स' कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील केडिया यांनी ट्विटमध्ये म्हटलंय...
‘राज ठाकरे हे लक्षात ठेवा, मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता, तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, मी मराठी शिकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करतो. क्या करना है बोल?’
मराठीच्या नावावर जर कोणी कायदा हातात घेणार असेल अथवा जबरदस्तीने मराठी बोलायला लावत असेल वा तत्सम अन्य कृती करत असेल तर अशी व्यक्ती, संस्था वा पक्ष कोणताही असला तरी मराठीच्या व्यापक हितासाठी, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, वैश्विक मराठी परिवार त्याचे समर्थन करत नाही. प्रत्येकाला आपली भाषा जपण्याचा हक्क आहे.
श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रमुख संयोजक, मराठीच्या व्यापक हितासाठी
दाेन भाऊ आज एकत्र
वरळीतील एनएससीआय डोम येथे होणाऱ्या विजयोत्सव मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मेळाव्याला ठाकरे बंधूंनी सगळ्या राजकीय पक्षांना आमंत्रित केले. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. कॉँग्रेसकडून कोणीही उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ सोबतच ‘जय गुजरात’चाही नारा दिला. यावरुन विरोधकांची चौफेर टीका सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली आहे.
फडणवीस म्हणाले की, चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करताना शरद पवार हे ‘जय कर्नाटक’ म्हणाले होते. याचा अर्थ त्यांचे महाराष्ट्रावर कमी प्रेम आहे असे समजायचे का? आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो तिथे त्यांच्याबद्दल बोलत असतो. मराठी माणूस वैश्विक आहे, याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेला आहे.
यावर शिंदे यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली. तर हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केला आहे.
भाषेच्या आधारावर गुंडगिरी चालणार नाही : फडणवीस
मराठी बोलण्याचा आग्रह करत मीरा रोडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला केलेल्या मारहाणीची दखल सरकारने घेतली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठी शिकावी असा आग्रह आपण करू शकतो, दुराग्रह करू शकत नाही. अशा प्रकारे भाषेच्या आधारावर गुंडगिरी केली तर आमचे सरकार सोडणार नाही.