सुशांतच्या वडिलांसह बहिणींचा जबाब नोंदवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 04:52 IST2020-06-17T04:52:05+5:302020-06-17T04:52:18+5:30

पोलिसांकड़ून सुशांतचे मित्र, नातेवाईकांकडे अधिक चौकशी सुरू

police takes statement from Sushant singh rajputs father and sisters | सुशांतच्या वडिलांसह बहिणींचा जबाब नोंदवला

सुशांतच्या वडिलांसह बहिणींचा जबाब नोंदवला

मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मंगळवारी वांद्रे पोलिसांनी त्यांचे वडील आणि दोन बहिणींचे जबाब नोंदविले. यात त्यांनी कुणावरही संशय नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

पोलिसांकड़ून सुशांतचे मित्र, नातेवाईकांकडे अधिक चौकशी सुरू आहे. तसेच त्याचा मोबाइलही तपासणीसाठी नेण्यात आला आहे. मंगळवारी वांद्रे येथे थांबलेल्या सुशांतचे वडील आणि त्याच्या दोन बहिणींचा जबाब पोलिसांनी नोंदवला. त्याच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात सुशांत कधीतरी तब्येत ठीक नसल्याचे सांगत असल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे तो नैराश्येत असल्याचे समजायचे असे त्यांचे म्हणणे आहे, मात्र त्याचे नेमके कारण त्यांनाही माहिती नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी त्याच्या घरातही झाडाझडती घेत, काही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्याच्या आतापर्यंतच्या चित्रपटांसंबंधी कॉन्ट्रॅक्टबाबतही पोलीस अधिक तपास करत आहेत.

अंकिता लोखंडेने घेतली सुशांतच्या वडिलांची भेट
सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने मंगळवारी त्याच्या वडिलांची भेट घेतली. पोलिसांनी तिची जुजबी चौकशी केल्याचेही समजते. मात्र तिचा कुठल्याही स्वरूपाचा जबाब नोंद केला नसल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. यापूर्वी सुशांतचा मॅनेजर सिद्धार्थ पिठाणी याचा जुजबी जबाब नोंदवला होता. मात्र, मंगळवारी त्याला पुन्हा सविस्तर जबाबासाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानेच दरवाजा उघडला व पोलिसांना आत्महत्येबाबत कळविले होते. याप्रकरणी वांद्रे पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत.

Web Title: police takes statement from Sushant singh rajputs father and sisters