पोलिसांना मिळाले रक्षाबंधनाचे गिफ्ट; १०० निरीक्षकांना ‘वरिष्ठ’पदी बढती, मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 06:05 IST2025-08-10T06:05:12+5:302025-08-10T06:05:51+5:30
३० वरिष्ठ पोलिस निरीक्षक झाले सहायक पोलिस आयुक्त

पोलिसांना मिळाले रक्षाबंधनाचे गिफ्ट; १०० निरीक्षकांना ‘वरिष्ठ’पदी बढती, मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल
मुंबई : मुंबई पोलिस दलात कार्यरत १०० पोलिस निरीक्षकांना रक्षाबंधनाचे गिफ्ट देत वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. सोबतच मुंबई पोलिस दलात पोलिस ठाणी आणि सहायक आयुक्त विभाग स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले असून, सहायक पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या केल्या आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी बढती मिळून नवीन नियुक्ती करण्यात आलेल्या १०० अधिकाऱ्यांमध्ये ज्ञानेश्वर अवारी यांची दादर पोलिस ठाणे, सोपान काकड (भायखळा), विलास भोसले (मलबार हिल), विनोद गावकर (पायधुनी), विलास राणे (ना. म. जोशी मार्ग), संजय जोशी (कुलाबा), योगेश साबळे (एम. आर. ए. मार्ग) या ठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर चेंबूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदानंद राणे, दादर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र आव्हाड, गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर, कांजूरमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ पाटील यांच्यासह एकूण ३० अधिकाऱ्यांना सहायक पोलिस आयुक्तपदी बढती मिळून त्यांच्या नवीन नेमणुका करण्यात आल्या. यात गुन्हे शाखेला चार सहायक पोलिस आयुक्त मिळाले आहेत.
मुंबई पोलिस दलात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असताना बढती मिळून मुंबई बाहेर नियुक्ती झालेल्या वाहतूक शाखेतील प्रभा राऊळ, गुन्हे शाखेतील शर्मिला सहस्त्रबुद्धे, ताडदेव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलिमा कुलकर्णी, डोंगरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश कुमार ठाकूर, टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत पवार यांच्यासह १९ अधिकाऱ्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
८ अधिकारी मुंबईतून बाहेर...
अंधेरी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शशिकांत भोसले, संरक्षण व सुरक्षा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मृत्युंजय हिरेमठ यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. तर, सहायक पोलिस आयुक्त रेणुका बागडे, मनीषा रावखंडे, कुसुम वाघमारे, माया मोरे आणि सुरेखा कपिले या पाच महिला अधिकाऱ्यांसह एकूण ८ अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी मुंबईतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
‘त्या’ २३ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
सहायक पोलिस आयुक्त/पोलिस उपअधीक्षकपदी मिळालेली बढती नाकारलेल्या मुंबई पोलिस दलातील २३ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यात चिमाजी आढाव (भायखळा), अजय अफाळे (दिंडोशी), रवींद्र क्षीरसागर (विनोबा भावे नगर) यांच्या गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आल्या आहेत.
या अधिकाऱ्यांवर नवीन जबाबदारी
गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांच्यावर पंतनगर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली असून, पंतनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवळे यांची चेंबूर पोलिस ठाण्याच्या नियुक्ती करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम डुबल आणि रुता नेमळेकर यांच्या अनुक्रमे सागरी २ आणि ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
सहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना नवी मुंबई येथील नवीन ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर मुंबईत नियुक्ती मिळालेल्या चार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.