शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 06:49 IST2025-07-01T06:49:02+5:302025-07-01T06:49:18+5:30
शेफालीच्या मृत्यूच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. या वेळी त्यांना औषधांचे दोन बॉक्स सापडल्याची माहिती आहे.

शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
मुंबई : अभिनेत्री शेफाली जरीवाला (४२) हिच्या मृत्यूचे नेमके कारण अजूनही पोलिसांकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र या प्रकरणी त्यांनी १४ हून अधिक जणांचे जबाब नोंदवले असून तिच्या घरातूनही काही औषधे हस्तगत केली आहेत. तसेच अंबोली पोलिसांची दोन पथके याचा तपास करत असल्याची माहिती आहे.
शेफालीच्या मृत्यूच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. या वेळी त्यांना औषधांचे दोन बॉक्स सापडल्याची माहिती आहे. ती स्किन ग्लो आणि अँटी-एजिंग औषधे वापरत असल्याची माहिती समोर येत आहे. तिचा मृत्यू झाला त्या दिवशी तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. तपास अधिकाऱ्यांनी तिच्या मृत्यूमागे गैरप्रकार असल्याचा संशय व्यक्त केला तरी मृत्यूचे नेमके कारण ते शोधत आहेत.
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
शेफालीच्या शवविच्छेदन अहवालाची पोलीस वाट पाहत असून त्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तिचे शवविच्छेदन हे व्हिडिओग्राफी करत करण्यात आले. तिची मेडिकल हिस्ट्री, तसेच गेल्या काही वर्षांत तिने कोणकोणत्या डॉक्टरांकडून उपचार घेतले याची माहिती पोलीस गोळा करत आहेत.
पोलिसांनी डॉक्टरांशीही चर्चा करत तिच्या घरी आढळलेल्या औषधांबद्दल तपशील त्यांच्याकडे शेअर केल्याचे समजते. शेफालीने एखादे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा उपाशीपोटी घेतले का? ज्यामुळे तिचा रक्तदाब खालावून तिला अटॅक आला या अनुषंगानेही ते तपास करत आहेत.
यांचे नोंदवले जबाब
पोलिसांनी १४ हून अधिक जणांचे जबाब त्यांनी नोंदवले आहेत. यात त्यांच्या घरचा नोकर, तिचा पती, डॉक्टर, मित्रमंडळी, तसेच ती ज्यांच्या संपर्कात होती त्या व्यक्ती, ती औषध खरेदी करत असलेल्या मेडिकलमधील कर्मचाऱ्यांचाही यात समावेश असल्याचे समजते.