जोडीदाराशी लग्न करण्यासाठी गर्भवतीला पोलिस संरक्षण; कुटुंबाची धमकी, हायकोर्टाचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:29 IST2025-10-24T11:29:06+5:302025-10-24T11:29:54+5:30
वडिलांनी आपल्या मुलीचा एप्रिलपासून पत्ता नसल्याचा दावा याचिकेद्वारे केला होता.

जोडीदाराशी लग्न करण्यासाठी गर्भवतीला पोलिस संरक्षण; कुटुंबाची धमकी, हायकोर्टाचा दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपल्या जोडीदाराशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आणि कुटुंबाकडून धमकी मिळाल्याचे सांगणाऱ्या ३१ वर्षीय गर्भवती महिलेच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी योग्य उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
महिला प्रौढ आहे. तिच्या कुटुंबाने तिच्या नातेसंबंधाला मान्यता दिलेली नसली तरी, तिला तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे न्या. सारंग कोतवाल आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने म्हटले.
गेल्या आठवड्यात दिलेल्या आदेशात न्यायालयाने महिलेच्या वडिलांनी दाखल केलेली हेबियस कॉर्पस (व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्याची विनंती) याचिका निकाली काढली. वडिलांनी आपल्या मुलीचा एप्रिलपासून पत्ता नसल्याचा दावा याचिकेद्वारे केला होता.
सध्या महाराष्ट्राबाहेर जोडीदारासोबत राहणारी ती महिला न्यायालयासमोर हजर झाली होती. तिने न्यायालयाला सांगितले की, ती स्वच्छेने घर सोडून गेली होती; कारण, तिचे कुटुंब तिच्या नात्याला विरोध करीत होते आणि अडथळे निर्माण करीत होते. ती तीन महिन्यांची गर्भवती असून, आपल्या जोडीदाराशी विवाह करून स्थायिक होण्याची इच्छा आहे.
काय म्हणाले न्यायालय?
याचिकाकर्ती प्रौढ आहे आणि स्वत:चे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. त्यामुळे या याचिकेमध्ये काहीही राहिलेले नाही. संबंधित महिलेने आपल्या कुटुंबाकडून धोका असल्याची भीती व्यक्त केली असल्याने तिच्या सुरक्षेची खात्री करणे आवश्यक आहे, असे म्हणत न्यायालयाने मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्याला निर्देश दिले की, संबंधित महिला ज्या भागात राहते त्या भागातील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा आणि तिच्या सुरक्षेची योग्य व्यवस्था करावी.
नात्याला नातलगांचा विरोध, जिवाला धोका
महिलेच्या वडिलांनी एप्रिलमध्ये वाकोला पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ही महिला महाराष्ट्राबाहेर जोडीदारासोबत राहत असल्याचे निष्पन्न केले. महिलेने न्यायालयात सांगितले की, तिचे पालक आणि नातेवाईक या नात्याला विरोध करीत असल्याने तिला आणि तिच्या जोडीदाराला धोका आहे.