खबरदारी! शस्त्रधारकांना पोलिसांच्या नोटिसा, जप्ती सुरू : सहपोलिस आयुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:57 IST2026-01-03T14:57:28+5:302026-01-03T14:57:52+5:30
निवडणूकपूर्व तयारी, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

खबरदारी! शस्त्रधारकांना पोलिसांच्या नोटिसा, जप्ती सुरू : सहपोलिस आयुक्तांची माहिती
मुंबई : निवडणूक प्रक्रियेत कोणतीही चूक, निष्काळजी किंवा नियमभंग खपवून घेतला जाणार नाही, असा सक्त इशारा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी मुख्य संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिला. सर्व शस्त्रधारकांना नोटिसा बजावल्या असून शस्त्र जप्तीची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी यावेळी दिली.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यालयात झालेल्या या बैठकीत निवडणूकपूर्व तयारी, कायदा व सुव्यवस्था, आचारसंहितेचे पालन, विविध भरारी पथकांचे कार्य, तसेच संशयास्पद व मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, रिझर्व्ह बँक, अग्रणी जिल्हा बँक, विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राखीव पोलिस दल, आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूकपूर्व तयारी, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
संशयास्पद रकमेची माहिती आयकर विभागाला कळवा
विमानतळ, रेल्वे स्थानके येथे होणारी अवैध पैशांची ने-आण, संशयास्पद व मोठ्या रकमेच्या व्यवहारांची माहिती, पैसे काढणे
व गिफ्ट कार्डसच्या बाबतची माहितीही तत्काळ आयकर विभागाला
कळवावी, असेही निर्देश या बैठकीत देण्यात आले.
पोलिसांकडून कार्यवाहीचा संभव्य आराखडा तयार
पालिकेच्या विभागनिहाय स्थापन केलेल्या भरारी पथकांसाठी
आवश्यक पोलिस कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवण्याच्या जागा, मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी तसेच मतदान यंत्राची वाहतूक करताना पोलिस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी पोलिसांनी
करावयाच्या कार्यवाहीचा संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. या शिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजना व तडीपारीच्या आवश्यक प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात येत आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचे निर्देश उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षकांना दिल्याची माहिती सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली.