भारीच ना राव... हरवलेले 44 हजार रुपये 20 मिनिटांत मिळाले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 09:03 IST2019-02-06T09:01:16+5:302019-02-06T09:03:50+5:30
अॅण्टॉप हिल पोलिसांच्या शिताफीमुळे सापडली पर्स

भारीच ना राव... हरवलेले 44 हजार रुपये 20 मिनिटांत मिळाले परत
मुंबई : एका मध्यमवर्गीय महिलेची वडापावच्या स्टॉलवर हरविलेली ४४ हजारांची रोकड असलेल्या पर्सचा अॅण्टॉप हिल पोलिसांच्या शिताफीमुळे अवघ्या २० मिनिटांत शोध लागला. पोलीस कॉन्स्टेबल दंगेकर यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल महिलेला पैशांसह पर्स परत मिळाली.
अॅण्टॉप हिल परिसरात मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. परिसरातील एका वडापावच्या स्टॉलवर निशा नावाची महिला आपल्या मुलासह वडापाव खात होती. त्या वेळी निशाने कामासाठी बॅँकेतून काढून आणलेले ४४ हजार रुपये असलेली पर्स बाजूला ठेवली होती. वडापाव खाल्ल्यानंतर मोबाइलवर फोन आल्याने ती बोलत पुढे गेली. थोड्या वेळानंतर आपण पर्स स्टॉलवरच विसरल्याचे तिच्या लक्षात आले. परत येऊन तिने पाहिले असता तेथे पर्स नव्हती. शोधाशोध करूनही पर्स न सापडल्याने तिने अॅण्टॉप हिल पोलिसांत तक्रार दिली. ड्युटीवरील अधिकारी वाणी यांनी तत्काळ कॉन्स्टेबल दंगेकर यांना तेथे पाठवले. त्यांनी स्टॉलचालकाला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पर्स परत केली. अवघ्या २० मिनिटांत ४४ हजार रुपये असलेली पर्स परत मिळाल्याने महिलेने पोलिसांचे आभार मानले.