Join us  

'मातोश्रीवर परत चला'; एकनाथ शिंदेंना घ्यायला गेलेल्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 11:20 AM

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे काही आमदार आसाममधील गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहत आहेत.

मुंबई/गुवाहाटी- भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे बंडखोर नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे युतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याच्या हालचाली एक-दोन दिवसात गतिमान होतील, असे मानले जात आहे. 

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे काही आमदार आसाममधील गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहत आहेत. या सर्व बंडखोरांना महाराष्ट्रात परतण्याचे आवाहन करण्यासाठी सातारातील उपजिल्हाप्रमुख संजय भोसले रॅडिसन ब्लू हॉटेलजवळ गेले होते. 'मातोश्रीवर परत चला' असं फलकही त्यांनी घेतलं होतं. मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे संवेदनशील क्षेत्र आहे. त्यामुळे कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

शिवसेनेकडून १२ आमदारांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलंबन करण्याचा अधिकारच नाही. कारण आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे आणि ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

बैठकीला उपस्थित राहिलो नाही, म्हणून तुम्ही आमदारकी रद्द करण्याची मागणी करताय..असं कधी होतं का?, बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे म्हणून आमदारांचं निलंबन केलं जावं, असं देशात कोणतंही उदाहरण नाही. तसेच संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.

तुम्हाला उद्धव ठाकरेंनीच गुवाहाटीला पाठवलंय का?

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच हात असल्याचे सांगण्यात येत हे. सध्या जे काही सुरु आहे, ती शिवसेनेचीच खेळी आहे. उद्धव ठाकरे यांनीत एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांना गुवाहटीला पाठवल्याची चर्चाही रंगली आहे, असा सवाल माध्यमांनी विचारला. त्यावर मला या चर्चांबाबत काही माहिती नाही, असं एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनापोलिस