Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस दाम्पत्याची तरुणाला मारहाण; दोन्ही तक्रारदारांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 07:32 IST

हा प्रकार पाहून नागरिक जमले. तेव्हा संबंधित तरुणाने अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप पोलिस महिलेने केला. तर आपण त्यांना गटाराच्या झाकणावर उडी मारू नका, असा इशारा केला होता.

मनीषा म्हात्रेमुंबई : विक्रोळीतील बारमधून बाहेर पडलेल्या पोलिस दाम्पत्याने एका तरुणाला अश्लील टिप्पणी केल्याच्या संशयावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मात्र, आपण अश्लील शेरेबाजी केली नाही, तर गटाराच्या झाकणावरून उडी मारू नका, असा इशारा केला होता, असा दावा तरुणाने केला आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींवरून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संबंधित महिला मुंबई पोलिसांत तर त्यांचे पती मीरा भाईंदर येथे कार्यरत आहेत. घटनेच्या सीसीटीव्ही चित्रणातील तपशिलानुसार, गेल्या महिन्यात २२ जानेवारीला रात्री विक्रोळीतील पूर्व द्रुतगती मार्गावरील एका हॉटेलजवळ ही घटना घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणावरून तपास सुरू केला आहे.  संबंधित दाम्पत्य रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर पोलिस महिलेने गटाराच्या झाकणावर उडी मारली. तेव्हा फुटपाथवर उभ्या तरुणाने उडी मारून दाखवताच महिलेने त्याच्याकडे धाव घेतली आणि शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यापाठोपाठ तिच्या पतीनेही तरुणाला रस्त्यावर पाडून मारहाण केली.

हा प्रकार पाहून नागरिक जमले. तेव्हा संबंधित तरुणाने अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप पोलिस महिलेने केला. तर आपण त्यांना गटाराच्या झाकणावर उडी मारू नका, असा इशारा केला होता. परंतु, त्यांनी चुकीचा अर्थ लावून मारहाण केली, असा दावा तरुणाने केला आहे. संबंधित तरुणाने पोलिसांत तक्रार दिली. सुरुवातीला विक्रोळी पोलिसांनी अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल केला. परंतु, पुढे मेडिकल रिपोर्ट सादर करताच पोलिसांनी अनोळखी गुन्हा नोंदवला. 

दोन तक्रारी दाखलपोलिस महिलेनेही तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार केली. ‘आम्ही वाढदिवस साजरा करून हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर माझे पती वॉशरूममध्ये गेले. तेव्हा तेथे उभ्या व्यक्तीने एकटक बघत जवळ येण्याचा इशारा केला. त्यामुळे आपण त्याच्या कानाखाली मारली’, असा दावा पोलिस महिलेने तक्रारीत केला आहे. त्याचबरोबर अश्विन भागवत या वकिलानेही आपला व्हिडीओ काढल्याचा आरोप महिलेने केला आहे. 

तुमच्याच मदतीसाठी व्हिडिओ काढत असल्याचे मी महिलेला सांगितले. त्यांनीही ‘दादा’ संबोधून मला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर माझ्या विरुद्ध खोटी तक्रार दिली. आमच्यातील बोलणे व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाले आहे. सर्व रेकॉर्डिंग पोलिसांकडे जमा केले आहे. याच प्रकरणात अटक टाळण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी माझ्याकडे ५० हजारांची मागणी केली. तसेच पोलिस दाम्पत्य दारूच्या नशेत असताना पोलिसांनी त्यांची वैद्यकीय चाचणी केली नाही. ॲड. अश्विन भागवत

या प्रकरणात दोन्ही तक्रारदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने तक्रारीतील सत्यता पडताळण्यात येत आहे.  चौकशीअंती कारवाई करण्यात येईल. तपास अधिकाऱ्याने पैसे मागितल्याच्या आरोपात तथ्य नाही. - सूर्यकांत नाईकवाडी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विक्रोळी पोलिस स्टेशन

टॅग्स :पोलिस