Join us

व्हीआयपी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना वरळी सी-लिंकवर उडवलं; हवालदाराचा मृत्यू, महिला कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 15:16 IST

वरळीतील कोस्टल रोडच्या कनेक्टिंग पॉईंटवर झालेल्या भीषण अपघातात पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला.

Worli Sea Link Accident: मंगळवारी सकाळी वरळी सी-लिंकवर अपघाताची मोठी घटना घडली असून एका पोलीस हवालदाराचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. वरळी सी-लिंक आणि कोस्टल रोडच्या कनेक्टिंग पॉईंटवर व्हीआयपी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या दोन पोलिसांना भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला तर आणखी एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे. जखमीवर वोकार्ड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सी-लिंकच्या कनेक्टिंग पॉइंटजवळ व्हीआयपी बंदोबस्तासाठी पोलीस हवालदार दत्तात्रय कुंभार आणि एक महिला पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने दोघांनाही चिरडले. त्यानंतर तात्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दत्तात्रय कुंभार यांचा मृत्यू झाला तर महिला कर्मचाऱ्यावर उपचार सुरु आहेत. दत्तात्रय कुंभार हे वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

दरम्यान, या प्रकरणी वरळी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास आणि चौकशी सुरु आहे. 

टॅग्स :मुंबई पोलीसअपघातमुंबई