Join us

मेट्रो, रस्ते प्रकल्पांच्या कामांना गती; नऊ प्रकल्पांच्या कामासाठी पोलिसांच्या परवानगीचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:16 IST

वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या उभारणीचाही समावेश

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कामे सुरू असलेल्या नऊ प्रकल्पांच्या कामांना वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामध्ये अटल सेतू ते वांद्रे वरळी सी लिंकला जोडणार वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या उभारणीचाही समावेश आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची आगामी काही दिवसात परवानगी मिळणार असल्याने आता प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलाचे पाडकाम करण्यास लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी वाहतूक शाखेचे सह पोलिस आयुक्त अनिल कुंभारे आणि एमएमआरडीएच्या अभियंत्यांची बैठक सोमवारी घेतली. या बैठकीत वाहतूक पोलिसांकडून परवानगी न मिळाल्याने काम थांबलेल्या प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ९ पायाभूत प्रकल्पांच्या १७ कामांना परवानगी देण्यास कुंभारे यांनी संमती दर्शविल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

निवडणुकीच्या काळात अनेक प्रकल्पांच्या कामासाठी वाहतूक पोलिसांकडून एमएमआरडीएला परवानगी देण्यात आली नव्हती. काही प्रकल्पांच्या कामांसाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळावी यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून एमएमआरडीएचे प्रयत्न सुरू होते. यातील वरळी शिवडी उन्नत मार्गिका, एससीएलआर प्रकल्पातील पश्चिम द्रुतगती मार्गावर दहीसर दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या काम, जोगेश्वरी येथील अंडरपास आदी प्रकल्पाचे काम रखडले होते. 

या प्रकल्पांचा समावेश 

मेट्रो ६ मार्गिकेच्या आयआयटी पवईजवळील वाहतुकीत बदल करण्यासाठी, महाकाली ते पवई लेकदरम्यानच्या कामासाठी, साकी विहार ते रामबाग दरम्यानच्या कामाचा समावेश आहे.

गुंदवली ते विमानतळ मेट्रो ७ अ मार्गिकेच्या पश्चिम द्रतगती मार्गावरील उन्नत मार्गाच्या कामाची परवानगी.

वरळी शिवडी उन्नत मार्गिकेच्या आचार्य दोंडे मार्गावर गर्डर उभारण्यासाठी रस्ता बंद करण्यासाठी, आचार्य दोंडे मार्गावरील सिग्नल पोल हलविण्यासाठी, एलफिस्टन रस्ता बंद करण्याच्या कामासाठी वाहतूक पोलिसांनी परवानगी मिळणार आहे.

मंडाळे ते डी. एन. नगर मेट्रो २ बी मार्गिकेच्या संपूर्ण मार्गाच्या कामाच्या परवानगीचा समावेश आहे. त्यात एसव्ही रस्त्यावर मिलन सबवे येथे उंची गेजची उभारणी, पश्चिम द्रुतगती मार्गावर वांद्रे येथे रेल ओव्हर ब्रीज उभारण्यासाठी वाहतूक वळविणे, एस. व्ही. रस्त्यावर वांद्रे मेट्रो स्टेशनच्या कामासाठी वाहतुकीत बदल केला जाणार आहे. 

दहीसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या कामाची परवानगी.

जोगेश्वरी येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर जनता कॉलनी येथील व्हेईक्युलर अंडरपासच्या कामाची परवानगी.

पश्चिम द्रुतगती मार्गावर आकुर्ली सबवेचे बांधकाम आणि रुंदीकरण.

सांताक्रुझ चेंबूर लिंक रस्त्याचे काम. बीकेसी ते कुर्ला उड्डाणपूल. 

टॅग्स :मुंबई पोलीसमेट्रोमुंबई