Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला मुंबईत आणण्यापूर्वी पाेलिस बाबाचा मृतदेह दारात; हेडफोनमुळे ऐकू आला नाही हॉर्न!

By मनीषा म्हात्रे | Updated: August 12, 2024 10:01 IST

कांजूर रेल्वे स्थानकामधील दुर्घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चार दिवसांपूर्वी बाळाच्या चाहुलीने घरात आनंदाचे वातावरण. आता मुंबईत भाड्याने घर घेऊ आणि पत्नी व बाळासोबत राहू, अशा उत्साहाने त्या पोलिसाने घराचा शोध सुरू केला. रविवारी कर्तव्य संपवून तो कांजूरमध्ये भाड्याने घर पाहण्यासाठी निघालेला. पाहतो तो काय रेल्वे स्थानकावर रविवारी गाड्यांचा गोंधळ. तेव्हा घर पाहायला जाण्याच्या उत्साहाच्या भरात त्याने रेल्वे ट्रॅकवरूनच फलाट ओलांडण्याचा निर्णय घेतला. पण या शॉर्टकटने त्यांची आनंदयात्रा कायमची संपवली.

रवींद्र बाळासाहेब हाके (२८) असे मृत पोलिसाचे नाव असून, ते मुंबई पोलिस दलातील सशस्त्र पोलिस दलात कार्यरत होते. मूळचे पुण्यातील इंदापूरमधील मदनवाडीमधील रहिवासी असलेल्या हाके यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. चार दिवसांपूर्वी पत्नीने बाळाला जन्म दिल्याने ते आनंदात होते. पत्नी आणि बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालविण्यासाठी त्यांनी कामापासून जवळच्या अंतरावर भाड्याने घराचा शोध सुरू केला.

कांजूर म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या मित्राला कॉल करून त्यांनी रविवारी घर पाहण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार रात्रपाळीचे कर्तव्य संपवून रविवारी सकाळी ते कांजूर स्थानकात उतरले. मात्र रविवारी मेगा ब्लॉक असल्याने गाड्या उशिराने असणार म्हणून त्यांनी पादचारी पुलाचा वापर न करता फलाट बदलण्यासाठी रेल्वे ट्रॅकचा शॉर्टकट  निवडला. मात्र कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असलेल्या हाके यांना रेल्वेची टॉवर वॅगन गाडी दिसली नाही. या अपघाताबाबत कुटुंबियांना कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या घटनेने पोलिस दलातही हळहळ व्यक्त होत आहे.

हेडफोनमुळे हॉर्न ऐकू आला नाही

हाके रूळ ओलांडत असताना टाॅवर वॅगन चालकाने बऱ्याचवेळा हॉर्न वाजवला. पण हेडफोन लावल्याने हाके यांना तो ऐकूच आला नाही आणि गाडीची धडक बसून ते गंभीर अवस्थेत रुळांवर कोसळले. या घटनेची वर्दी मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हाके यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांनी दिली.

टॅग्स :रेल्वेअपघात