नेव्हीतील कमांडरचा एफआयआर घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:25 AM2019-07-10T00:25:27+5:302019-07-10T00:25:29+5:30

कफ परेड पोलिसांची चालढकल; अकाउंटवरील रक्कम परस्पर हडप

Police in avoiding an FIR for Navy commander | नेव्हीतील कमांडरचा एफआयआर घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

नेव्हीतील कमांडरचा एफआयआर घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

Next

जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नेव्हीतील एका कमांडरच्या बँक खात्यातून अज्ञाताने परस्पर ९० हजार रुपये काढले आहेत. त्याबाबत तक्रार अर्ज देऊनही गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. सायबर गुन्ह्यासंबंधी तक्रारी तातडीने सोडविण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिले असताना कफ परेड पोलिसांनी मात्र अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.


नौदलाच्या पश्चिम विभागामध्ये कमांडर म्हणून कार्यरत असलेले संजय सोलवट यांच्या आयसीआयसीआय बॅँकेच्या खात्यातून २ मे रोजी सायंकाळी पाच मिनिटांच्या अंतराने पाच वेळा ९० हजार रुपये काढण्यात आले. मोबाइलवर मेसेज आल्यानंतर त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून डेबिट कार्ड बंद केले. बॅँकेला मेल करून तक्रार नोंदविली. याबाबत ३ मे रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, आजतागायत गुन्हा दाखल झालेला नाही. तपास अधिकारी सहायक निरीक्षक जाधव यांनी मागणी केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर २८ दिवसांनी काढलेली रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यात जमा झाली.

चोरट्याने अहमदाबादेतील एटीएम सेंटरमधून ही रक्कम काढल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फूटेजवरून काढलेल्या छायाचित्रात चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे त्यांनी पूर्ण व्हिडीओ फूटेजची मागणी केली आहे. मात्र, बॅँकेने ते अद्याप पाठविलेले नाही. याबाबत वरिष्ठ निरीक्षक रश्मी जाधव यांनी आपल्याला याबाबत माहिती नाही, तक्रार अर्ज आल्यानंतर शहानिशा करून गुन्हा दाखल केला जातो, असे सांगून फोन बंद केला.

तपास होणे आवश्यक
माझ्या खात्यातून काढण्यात आलेली रक्कम बॅँकेकडून परत मिळाली असली, तरी या चोरीचा छडा लागला पाहिजे, अन्यथा पुन्हा असा प्रकार घडू शकतो, त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करावा, यासाठी आपण बॅँक व पोलिसांकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र, त्यांचा प्रतिसाद निराशजनक आहे. - संजय सोलवट, तक्रारदार व कमांडर, नौदल

Web Title: Police in avoiding an FIR for Navy commander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.