Join us  

जान्हवी आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी केली पोलीसपुत्राला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 6:29 AM

निखिलच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून ते पोलीस खात्यात कार्यरत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मुंबई : पालिकेच्या जलविभागात कार्यरत  कर्मचाऱ्याची मुलगी जान्हवी चव्हाण (२१) हिने रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. तिने मृत्यूच्या काही तासापूर्वी आरोपी पोलीसपुत्र निखिल चव्हाण याला कॉल केला आणि त्यानंतर हे पाऊल उचलले. तसेच त्याच्याविरोधात तक्रार करायला ती पोलीस ठाण्यात गेल्याचेही तिच्या वडिलांचे म्हणणे आहे. दरम्यान, मंगळवारी त्याला अटक करण्यात आली आहे.

जान्हवीच्या शेजारी तिचा एक मित्र राहतो. तिचे वडील विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने आत्महत्या केली. त्याच्या काही तासांपूर्वी ती अटकेतील आरोपी निखिलला तिच्या मोबाइलवरून सतत फोन करत होती. मात्र तो फोन घेत नव्हता. परिणामी तिने तिच्या या शेजारच्या मित्राचा मोबाइल मागत त्यावरून निखिलला फोन केला आणि त्यांचे बोलणे झाले. त्यानंतर तिने त्याचा मोबाइल क्रमांक मित्राच्या मोबाइलवरून डिलिट केला. जवळपास आठच्या सुमारास तिला घराबाहेरही शेजाऱ्यांनी पाहिले आणि रात्री साडेबाराच्या सुमारास वडील घरी आले, तेव्हा जान्हवी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. 

विजय यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी मृत्यूच्या काही दिवस आधी मेघवाडी पोलीस ठाण्यात निखिलविरोधात तक्रार करायला गेली होती. त्यावेळी पोलिसांनी तिच्याकडे तिच्या पालकांबाबत विचारणा केली. त्यावर ‘माझे आई, वडील हयात नाहीत’ असे तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी निखिलला फोन करून दम दिला आणि त्याने, मी तिच्या घरी जाऊन तिला भेटतो, असे उत्तर पोलिसांना दिले. 

निखिलच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून ते पोलीस खात्यात कार्यरत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मेघवाडी पोलिसांनी त्याला अटक करून त्यादिवशी नेमके काय घडले, याबाबत सध्या तपास सुरू आहे.  

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसमुंबई