दिव्यांग प्रवाशाला मारहाण; १२ तासांत आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 06:52 IST2026-04-01T06:49:36+5:302026-04-01T06:52:20+5:30
प्राथमिक तपासात हा प्रकार दादर ते घाटकोपर दरम्यान घडल्याचे निष्पन्न

दिव्यांग प्रवाशाला मारहाण; १२ तासांत आरोपी ताब्यात
मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला झालेल्या मारहाणीच्या घटनेत पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपी महिलेस तिच्या अल्पवयीन मुलासह ताब्यात घेतले. ही कारवाई कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यादव आणि त्यांच्या पथकाने केली.
२७ मार्च रोजी दुपारी सुमारे २:५८ वाजण्याच्या सुमारास दादर स्थानकावर आलेल्या कर्जत फास्ट लोकलच्या दिव्यांग डब्यात एका दिव्यांग प्रवाशाला महिला व तिच्या मुलाने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्राथमिक तपासात हा प्रकार दादर ते घाटकोपर दरम्यान घडल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास करताना कुर्ला रेल्वे पोलिसांनी विशेष पथके तयार केली. तपासादरम्यान पीडित प्रवाशाचे नाव 'सज्जाद' असल्याचे समोर आले. त्याने घाटकोपर येथे उतरून पुन्हा सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडल्याची माहिती मिळाली होती.
दिव्यांग प्रवाशांनी काढला व्हिडीओ
या घटनेचा व्हिडीओ चित्रित करणारे दिव्यांग प्रवासी व साक्षीदार मनीष राजू होतवाणी यांची पोलिसांनी संपर्क साधून तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व व्हिडीओतील छायाचित्रांच्या आधारे आरोपींचा माग काढत आरोपी महिला नंदा पवार हिला कलिना येथून ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील कारवाईसाठी तिला दादर रेल्वे पोलिस ठाण्याकडे सोपविण्यात आले असून तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.